कारप्रकरणी भारताचा क्रमांक 8 वा : रोड ट्रान्सपार्ट ईयर बुकची आकडेवारी
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रोड ट्रान्सपोर्ट ईयर बुकच्या नव्या आकडेवारीनुसार भारतात नोंदणीकृत दुचाकी वाहनांची संख्या सर्वाधिक आहे. भारतानंतर याप्रकरणी इंडोनेशियाचा क्रमांक लागतो. तर कार्सच्या संख्येप्रकरणी भारत जगात 8 व्या स्थानावर आहे. या यादीत चीन, अमेरिका अन् जपान पहिल्या तीन स्थानांवर आहेत.
अहवालात इंटरनॅशनल रोड फेडरेशनच्या 2020 च्या डाटाचा दाखला देण्यात आला असून याला देशांच्या संदर्भात वापरले जाते. या अहवालात नोंदणीकृत वाहनांवर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा डाटा सामील करण्यात आला आहे. अहवालानुसार भारतात 2020 मध्ये 32.63 कोटी वाहने होती, ज्यातील सुमारे 75 टक्के वाहने ही दुचाकी स्वरुपातील होती. याचदरम्यान मागील तीन वर्षांमध्ये देशात 2 कोटीहून अधिक नव्या वाहनांची नोंदणी झाली आहे. यानंतर जुलैच्या मध्यापर्यंत देशात एकूण नोंदणीकृत वाहनांची संख्या 34.8 कोटी झाली आहे. ही माहिती सरकारच्या ट्रान्सपोर्ट पोर्टलद्वारे प्राप्त झाली आहे.
कुठल्या राज्यात सर्वाधिक वाहने
नोंदणीकृत वाहनांच्या संख्येप्रकरणी महाराष्ट्र देशात पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्रात एकूण 3.78 कोटी वाहने नोंदणीकृत आहेत. तर उत्तरप्रदेशात 3.49 कोटी वाहने आहेत. या यादीत तिसऱ्या क्रमांकावर तामिळनाडून असून तेथे 3.21 कोटी वाहने नोंदणीकृत आहेत. तर 10 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमधील वाहनांच्या संख्येप्रकरणी दिल्लीत सर्वाधित 1.18 कोटी वाहने नोंदणीकृत आहेत. तर बेंगळूरमध्ये 96.4 लाख वाहने नोंदणीकृत आहेत. दिल्लीत नोंदणीकृत खासगी वाहनांची संख्या सर्वाधिक होती, तर नजीकच्या फरीदाबाद शहरात ट्रान्सपोर्ट किंवा वाणिज्यिक वाहनांची सर्वाधिक नोंदणी झाली आहे.

खासगी वाहनांची संख्या का वाढतेय?
आकडेवारीनुसार 55 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये देशातील सर्व नोंदणीकृत खासगी वाहनांच्या सुमारे 34 टक्के हिस्सा आहे. मोठ्या शहरांमध्ये सार्वजनिक वाहतूक सेवेच्या कमतरतेमुळे लोक खासगी वाहनांचा वापर करत असल्याचे यातून निदर्शनास येते. छोट्या शहरामंध्ये देखील जवळपास हीच स्थिती आहे. तेथे बहुतांश लोक दुचाकी वाहनांचा वापर करतात. खासगी वाहनांची हिस्सेदारी वाढत असल्याने दुर्घटनांचे प्रमाण वाढत असल्याचे रस्ते सुरक्षा तज्ञांचे सांगणे आहे.
अन्य देशांमधील स्थिती
मलेशियासारख्या काही देशांमध्ये 50 टक्के दुचाकी वाहने असून तेथे दुर्घटना रोखण्यासाठी दुचाकी वाहनांसाठी वेगळी मार्गिका तयार केली जात आहे. अलिकडेच स्वीडनमध्ये पार पडलेल्या ‘व्हिजन झिरो’ परिषदेत 100 हून अधिक देश 20230 पर्यंत रस्ते मृत्यूदर निम्म्यावर आणण्याची योजना आखण्यासाठी एकत्र आले होते. जगभरात दुचाकींचा वाढता वापर सर्वात मोठे आव्हान ठरत असल्याचे मत या परिषदेत व्यक्त झाले. भारतात 2021 मध्ये दुचाकीस्वारांच्या मृत्यूचा आकडा वाढून 69,385 झाला आहे. हे प्रमाण रस्ते दुर्घटनांमधील एकूण बळींच्या तुलनेत 45 टक्के इतके आहे.









