वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
विश्व अॅथलेटिक्स आंतरखंडीय टूरवरील अॅथलेटिक्स स्पर्धा भरविण्याची संधी भारताला पहिल्यांदाच लाभली आहे. 2025 च्या 10 ऑगस्ट रोजी भुवनेश्वरमध्ये विश्व अॅथलेटिक्स खंडीय टूरवरील अॅथलेटिक्स स्पर्धा घेतली जाणार असल्याची माहिती राष्ट्रीय अॅथलेटिक्स फेडरेशनने रविवारी दिली.
अखिल भारतीय अॅथलेटिक्स फेडरेशनच्या रविवारी झालेल्या बैठकीमध्ये 2025 सालातील अॅथलेटिक्स स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. ट्रॅक आणि फिल्ड प्रकारातील सदर आंतर खंडीय अॅथलेटिक्स स्पर्धा भारतात घेण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. ट्रॅक आणि फिल्ड क्षेत्रातील ही कॉन्टीनंटल टूरवरील स्पर्धा प्रत्येक वर्षी आयोजित केली जाणार आहे. 2004 साली दिल्लीत झालेल्या विश्व हाफ मॅरेथॉन चॅम्पियनशीपचे यजमानपद भारताने भूषविले होते.









