मुर्शिदाबाद हिंसाचाराबाबत भाष्य न करण्याचा इशारा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे घडलेल्या हिंसाचारावर विधाने करणाऱ्या बांगलादेशला भारताने शुक्रवारी कडक शब्दात खडे बोल सुनावले आहेत. भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याऐवजी आपल्या देशातील अल्पसंख्याकांच्या संरक्षणावर लक्ष केंद्रित करण्यास भारताने बांगलादेशला सांगितले आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांच्या प्रसारमाध्यम सचिवांनी केलेल्या वक्तव्यानंतर भारताने संताप व्यक्त केला आहे.
गेल्या आठवड्यात बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये झालेल्या हिंसाचारामुळे प्रभावित झालेल्या अल्पसंख्याक मुस्लिमांचे भारताने संरक्षण करावे, असे वक्तव्य बांगलादेशने केले होते. यासोबतच त्यांनी या हिंसाचाराला भडकवण्यात बांगलादेशचा हात असल्याचा इन्कार केला. शुक्रवारी भारताने या विधानाचा तीव्र निषेध केला. बांगलादेशचे हे विधान धूर्तपणा आणि कपटाने भरलेले आहे. ते आपल्या देशातील अल्पसंख्याकांच्या हत्यांवरून लक्ष विचलित करू इच्छित असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले. पश्चिम बंगालमधील घटनांबाबत बांगलादेशने केलेल्या टिप्पण्या आम्ही नाकारतो. बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवर अत्याचार करणारे गुन्हेगार मोकाट फिरत असताना भारताकडे लक्ष देण्याची काहीच गरज नसल्याचे जयस्वाल यांनी सुनावले.
बांगलादेशात यावर्षी अल्पसंख्याकांवर 72 हल्ले
अलिकडच्या काळात बांगलादेशात अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी गेल्या महिन्यात संसदेत यासंबंधी माहिती देताना 2024 मध्ये बांगलादेशमध्ये राजकीय अशांतता सुरू झाल्यापासून अल्पसंख्याकांवर अत्याचाराच्या 2,400 घटना घडल्याचे म्हटले होते. तसेच चालू वर्षात आतापर्यंत अशा 72 घटना घडल्याचेही निदर्शनास आले आहे.
मुर्शिदाबादमध्ये 8 एप्रिलपासून हिंसाचार
भारतात 8 एप्रिल रोजी वक्फ सुधारणा कायदा लागू झाला. त्यानंतर पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये हिंसाचार झाला. आंदोलकांनी अनेक वाहने पेटवून दिली आहेत. यामध्ये पोलिसांच्या वाहनांचाही समावेश होता. निदर्शकांशी झालेल्या संघर्षात अनेक पोलीस जखमी झाले असून अजूनही परिस्थिती पूर्णपणे निवळलेली नाही.









