वृत्तसंस्था/ब्रसेल्स
नाटोमधील अमेरिकेचे राजदूत मॅथ्यू व्हिटेकर यांनी युक्रेन युद्धाप्रकरणी भारताला लक्ष्य केले आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या रशियाच्या आक्रमणाला भारत फंडिंग करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भारत, चीन आणि ब्राझील सारख्या देशांना कच्च्या तेलाच्या विक्रीतूनच युक्रेनमध्ये रशियाच्या सैन्यमोहिमेचे वित्तपोषण होतेय. रशियावरील आर्थिक दबाव वाढविण्यासाठी या देशांवर अतिरिक्त निर्बंध लादण्यात यावे असे आवाहन त्यांनी केले आहे. रशियाची अर्थव्यवस्था कमकुवत पडत असून कच्च्या तेलातून प्राप्त होणारे उत्पन्नच युद्धासाठी निधी जमविण्याचा मुख्य स्रोत ठरले आहे. कुठलेही अतिरिक्त निर्बंध आणि शुल्क युरोपीय महासंघ तसेच आंतरराष्ट्रीय समुदायासोबत समन्वित केले जावेत, जेणेकरून युक्रेनमधील रशियाची आक्रमकता अस्वीकारार्ह असल्याचा स्पष्ट संदेश देता येईल अशी भूमिका व्हिटेकर यांनी मांडली आहे.
चीन अन् ब्राझीलवरही निशाणा
युद्धासाठी जो पैसा खर्च होतोय, तो भारत, चीन आणि ब्राझीलसारख्या देशांच्या कच्च्या तेलाच्या विक्रीतून प्राप्त होतोय. पुढील टप्प्यात रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांच्यासाठी व्यापाराचा खर्च वाढविणे आणि महसूल कमी करण्यासाठी अतिरिक्त निर्बंध आणि शुल्क लादावे लागतील असे वक्तव्य त्यांनी केले आहे.









