वृत्तसंस्था/ बर्लिन, जर्मनी
भारताच्या कनिष्ठ पुरुष हॉकी संघाने येथे सुरू असलेल्या चौरंगी हॉकी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करीत तिसरे स्थान मिळविले. रोहितने 45 व्या मिनिटाला भारताला बरोबरी साधून दिल्यानंतर अजीत यादवने चौथ्या सत्रात 52 व्या मिनिटाला नोंदवलेला संघाचा दुसरा गोल निर्णायक ठरला. त्याआधी कर्णधार टॉबी मॅलनने उत्तरार्धात ऑस्ट्रेलियाला आघाडीवर नेले होते. पूर्वार्धात दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. पण कोणालाही गोल नोंदवण्यात यश आले नाही. भक्कम बचाव आणि शिस्तबद्ध खेळ यामुळे मिळालेल्या संधींचा लाभही कोणाला घेता आला नाही.
तिसऱ्या सत्रात ऑस्ट्रेलियाला कोंडी फोडण्यात यश आले. 40 व्या मिनिटाला टॉबी मॅलनने शानदार मैदानी गोल नोंदवत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. भारतानेही त्याला लगेचच प्रत्युत्तर दिले. पाच मिनिटानंतर रोहितने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवत भारताला बरोबरी साधून दिली. या गोलनंतर उत्साह दुणावलेल्या भारताने शेवटच्या सत्रात विजयी गोल करण्यात यश मिळविले. 52 व्या मिनिटाला अजीत यादवने मैदानी गोल नोंदवत भारताला आघाडीवर नेले आणि हाच गोल शेवटी निर्णायक ठरला.
चौरंगी हॉकी स्पर्धेतील भारताची मोहिम संपली असून गट साखळी फेरीत भारताला यजमान जर्मनीकडून 1-7 असा पराभव स्वीकारावा लागल्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्टेलियावर 3-1 असा विजय मिळविला. त्यानंतर स्पेनकडून भारत 1-5 अशा गोलफरकाने पराभूत झाला होता.









