रोमांचक सामन्यात जॉर्डनचा 91-84 गुणांनी विजयी
वृत्तसंस्था/ जेद्दाह
येथे सुरू झालेल्या एफआयबीए आशिया चषक बास्केटबॉल स्पर्धेतील पहिल्या सामन्यात झुंजार प्रदर्शन करीत वरचे मानांकन असलेल्या जॉर्डनला विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. जॉर्डनने हा सामना 91-84 अशा निसटत्या गुणफरकाने जिंकला.
जॉर्डन हा या स्पर्धेच्या संभाव्य विजेत्यांपैकी एक संघ असून भारताने जबरदस्त धैर्य व संयम दाखवत नियमित वेळ संपण्यास एक मिनिट बाकी असताना 80-76 अशी आघाडी घेतली होती. पण अनुभव व क्लच शूटिंगच्या बळावर जॉर्डनने मुसंडी मारली आणि जादा वेळेत युवा भारतीय संघावर विजय मिळविला. भारतातर्फे अरविंद कृष्णनने सर्वाधिक 14 गुण नोंदवले, त्यात पाच रिबाऊंड्स व चार असिस्ट होते. प्रणव प्रिन्सने 12 गुणांची भर घातली, त्यात 7 रिबाऊंड्स व 5 असिस्ट होते आणि एक महत्त्वाचा ब्लॉकचा समावेश होता.
प्रिन्सच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर चौथ्या सत्रात नियंत्रण मिळवित जॉर्डनवर आघाडी घेतली. त्यात 53 सेकंद बाकी असताना दोन पझेशनचे कुशन देणारा महत्त्वाच्या बकेटचा समावेश होता. ‘आपल्याकडे तरुण संघ असून मानसिक कणखरतेत हा संघ कमी पडला. मात्र मला या संघाचा अभिमान वाटतो. या संघाकडून तशी फार मोठी अपेक्षा नव्हती, पण तरीही त्यांनी चांगली संधी निर्माण केली होती,’ अस भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक स्कॉट फ्लेमिंग सामन्यानंतर म्हणाले.
भारताने या सामन्यात भक्कम बचावाचे दर्जेदार प्रदर्शन करीत जॉर्डनवर दबाव आणत विजयासाठी संघर्ष करण्यास भाग पाडले. नियमित वेळेतील शेवटच्या पझेशनमध्ये बचावपटूंना खेचत मुइन बेक हाफीझला बाद केले. हाफीझचा बझर बीटिंगचा प्रयत्न थोडक्यात हुकला. जॉर्डनच्या हाशेम अब्बासने 24 गुण नोंदवले. त्यात 7 रिबाऊंड्सचा समावेश होता. त्याची कामगिरीच दोन्ही संघांतील महत्त्वाचा फरक ठरला तर दार टकरने आघाडीवर राहत सर्वाधिक 30 गुण मिळविले. भारताची पुढील लढत 16 वेळचे चॅम्पियन्स चीनविरुद्ध गुरुवारी होणार आहे.









