वृत्तसंस्था / लंडन
2030 साली होणाऱ्या शतक महोत्सवी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपद शर्यतीमध्ये एकूण पाच देशांचा समावेश आहे. दरम्यान भारताला आता कॅनडा, नायजेरीया आणि अन्य दोन प्रतिस्पर्ध्यांकडून कडवा प्रतिकार अपेक्षित आहे. या स्पर्धेच्या यजमानपदाची घोषणा तब्बल 1 महिन्यानंतर केली जाणार आहे.
2036 च्या ऑलिम्पिक स्पर्धा यजमानपद शर्यतीमध्येही भारत आघाडीवर आहे. आता 2030 ची राष्ट्रकुल स्पर्धा गुजरातमध्ये भरविण्यासाठी भारताचे जोरदार प्रयत्न चालु आहेत. आगामी राष्ट्रकुल स्पर्धा भरविण्यासाठी जगातील सात देशांनी आपली इच्छुकता दर्शविली आहे. 2034 ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भरविण्यासाठी न्यूझीलंडचे प्रयत्न चालु आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदासाठी आफ्रिका, अमेरिका, आशिया आणि ओसेनिया या विभागातील देशांचा विचार केला जातो. दरम्यान कॅनडा, भारत आणि नायजेरिया या तीन देशांनी 2030 च्या राष्ट्रकुल स्पर्धा यजमानपदासाठी आपले अर्ज दाखल केले असून यामध्ये भारत हा प्रमुख दावेदार असल्याचे सांगण्यात आले. 2026 ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ग्लॅस्गो येथे होणार आहे.









