युएन मानवाधिकार प्रमुखाचा दावा : पाकिस्तान, इराणच्या धोरणाबाबत चिंता
वृत्तसंस्था/ संयुक्त राष्ट्रसंघ
संयुक्त राष्ट्रसंघ मानवाधिकार उच्चायुक्त वोल्कर तुर्क यांनी रोहिंग्या मुस्लीम अणि विविध देशांमध्ये आश्रय घेणाऱ्या लोकांच्या स्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. अमेरिका, पाकिस्तान, इराण, युरोपीय देश आणि भारताने शरणार्थींची स्थिती सुधारण्याच्या दिशेने प्रयत्न करावेत असा आग्रह त्यांनी केला आहे. भारताने रोहिंग्या मुस्लिमांना भूमी आणि जलमार्गाने देशातून निवसित केल्याचा दावा त्यांनी केला आहे.
काही देशांमध्ये स्थलांतरित आणि शरणार्थींच्या अधिकारांचे उल्लंघन करणारी धोरणे आणि प्रथांना सामान्य स्वरुप मिळाले आहे. हा गंभीर चिंतेचा विषय आहे. मानवाधिकार हा सर्व समृद्ध समाजांचा मजबूत पाया आहे, परंतु आता या अधिकारांना कमकुवत करणारा धोकादायक कल जागतिक स्तरावर वाढत असल्याचे तुर्क यांनी म्हटले आहे.
पाकिस्तान आणि इराणमधून बळजबरीने बाहेर काढण्यात येणाऱ्या अफगाणी नागरिकांवरून चिंता व्यक्त केली. भारताने देखील रोहिंग्या मुस्लिमांच्या समुहांना देशातून बाहेर काढले आहे. तर जर्मनी, ग्रीस, हंगेरी आणि अन्य युरोपीय देशांनी आश्रयाच्या मागणीचा अधिकार मर्यादित करणारी धोरणे अवलंबिली असल्याचे तुर्क यांनी म्हटले आहे.
अमेरिकेने अल साल्वाडोर, दक्षिण सूडान, एस्वातिनी आणि रवांडा समवेत अनेक देशांसोबत त्रयस्थ देशांच्या नागरिकांना तेथे डांबून ठेवण्याबाबत करार केला आहे. या करारांमुळे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा दावा वोल्कर तुर्क यांनी केला आहे. मानवाधिकार संस्था ‘ह्युमन राइट्स वॉच’नुसार भारतात सुमारे 40 हजार रोहिंग्या राहत असू यातील कमीतकमी 20 हजार रोहिंग्या संयुक्त राष्ट्रसंघ शरणार्थी संस्थेत नोंदणीकृत आहेत.









