वृत्तसंस्था/ हिसर, ताजिकिस्तान
ताजिकिस्तानच्या हिसर येथील हिसर सेंट्रल स्टेडियमवर झालेल्या सीएएफए (काफा) नेशन्स कप 2025 मधील गट ‘ब’च्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानला गोलशून्य बरोबरीत रोखल्याने भारताने तिसऱ्या स्थानासाठीच्या प्लेऑफ सामन्यासाठी पात्र होण्यात यश मिळविले आहे.
ब्ल्यू टायगर्सना त्यांचे भवितव्य जाणून घेण्यासाठी इराण आणि ताजिकिस्तान यांच्यातील दुसऱ्या सामन्याची वाट पाहावी लागली, जो 2-2 असा बरोबरीत संपला. खालिद जमीलचा संघ चार गुणांसह (एक विजय, एक पराभव आणि एक बरोबरी) गटात दुसऱ्या स्थानावर राहिला, तर इराणने तीन सामन्यांतून सात गुणांसह गट ‘ब’मध्ये अव्वल स्थान पटकावले. यजमान ताजिकिस्तान चार गुणांसह आणि अफगाणिस्तान एका गुणासह स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
पहिल्या सामन्यात ताजिकिस्तानचा 2-1 असा पराभव केल्याने भारताने त्यांच्याविरुद्धच्या कामगिरीच्या जोरावर पुढे राहिला. भारतीय संघ आता 8 सप्टेंबर रोजी त्याच ठिकाणी तिसऱ्या स्थानासाठीचा सामना खेळेल, त्यांचा सामना गट ‘अ’मध्ये दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या संघाशी होईल. सध्या ओमान आणि उझबेकिस्तान यांचे प्रत्येकी चार गुण झालेले आहेत, ते गटामध्ये अव्वल दोन स्थानांवर आहेत. दोघांचाही गोलफरक समान आहे (1) आणि त्यांनी त्यांच्या दोन सामन्यांमध्ये समान गोल केले आहेत (3). तुर्कमेनिस्तान आणि किर्गिझ प्रजासत्ताक प्रत्येकी एका गुणासह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. ओमान आता तुर्कमेनिस्तानशी खेळेल, तर उझबेकिस्तानचा सामना गट ‘अ’च्या शेवटच्या सामन्यात किर्गिझ प्रजासत्ताकशी होईल.
अफगाणिस्तानने सामन्याची सुऊवात जोरात केली असली, तरी भारताने प्रतिहल्ल्यात अधिक स्पष्ट संधी निर्माण केल्या. यात आशिक कुऊनियानने डावीकडून मुसंडी मारल्यानंतर इरफान यादवाडला चेंडू पुरविला होता, पण इरफानचा फटका हुकला. 24 व्या मिनिटाला भारताचा गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूने अली रेजा पनाहीच्या एका लांब फटक्याला निष्फळ ठरविले. काही मिनिटांनंतर यादवाड अफगाणिस्तानच्या गोलक्षेत्रात घुसला, परंतु त्याचा अखेरचा फटका गोलपोस्टच्या बाहेर गेला. दुसऱ्या सत्रात भारताने खेळावर अधिक नियंत्रण मिळवून मुख्य प्रशिक्षक खालिद जमील यांनी मनवीर सिंग (ज्युनियर) आणि विक्रम प्रताप सिंह यांना उतरविले. मात्र बऱ्याच संधी वाया जाऊन कोंडी शेवटपर्यंत फुटली नाही.









