वृत्तसंस्था/ पोश्चेफस्टूम
आयसीसीच्या महिलांच्या 19 वर्षाखालील वयोगटातील टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत रविवारी येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात जेतेपदासाठी लढत होणार आहे. हा सामना येथील सेनवेस पार्क स्टेडियमवर भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 5.15 वाजता सुरू होईल.
या स्पर्धेमध्ये भारतीय महिला संघाने आतापर्यंत दर्जेदार कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. भारतीय संघाने या स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा दणदणीत पराभव करत अंतिम फेरी गाठली. तर इंग्लंडने बलाढय़ ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आणत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य लढतीत भारतीय गोलंदाजांची कामगिरी अधिक दर्जेदार ठरली. भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला 20 षटकात 9 बाद 107 धावांवर रोखण्यात यश मिळविले होते. भारतीय संघातील पार्श्वी चोप्राने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर 20 धावात 3 तर कर्णधार शेफाली वर्माने केवळ 7 धावात 1 गडी बाद केला होता. त्यानंतर भारताने 14.2 षटकात विजयाचे उद्दिष्ट गाठले. भारतीय संघातील श्वेता शेरावतने या सामन्यात नाबाद 61 धावांची खेळी केली.
भारतीय संघाला या स्पर्धेचे जेतेपद मिळविण्यासाठी सर्वच विभागात दर्जेदार कामगिरी करावी लागेल. चिवट इंग्लंडने उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाचे कडवे आव्हान संपुष्टात आणण्यात यश मिळविल्याने रविवारचा हा अंतिम सामना शेवटच्या चेंडूपर्यंत चुरशीचा होईल, अशी आशा बाळगली जात आहे.









