वृत्तसंस्था/ साउथॅम्प्टन
इंग्लंडविऊद्ध टी-20 मालिका जिंकल्यानंतर आत्मविश्वासाने भरलेला भारतीय महिला संघ आज बुधवारपासून येथे सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही हीच गती कायम ठेवण्याचे लक्ष्य ठेवेल. या संघाने इंग्लंडविऊद्धची पहिली टी-20 मालिका जिंकून इतिहास रचला. पाच सामन्यांची मालिका त्यांनी 3-2 अशी जिंकली.
आता या वर्षाच्या अखेरीस घरच्या मैदानावर होणाऱ्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर हरमनप्रीत कौर आणि तिची टीम त्यांच्या 50 षटकांच्या सामन्यातील कामगिरीत सुधारणा करण्यास उत्सुक असेल. भारताने त्यांची शेवटची एकदिवसीय मालिका मे महिन्यात जिंकली होती. त्यावेळी श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश असलेली तिरंगी मालिका त्यांनी जिंकली होती. येथे मालिका विजय मिळवल्यास जागतिक स्पर्धेपूर्वी त्यांच्या तयारीला आणखी बळ मिळेल आणि मनोबल आणखी वाढेल. भारताने अलीकडच्या काळात त्यांच्या दृष्टिकोनात बदल केला असून 300 पेक्षा जास्त धावा काढण्यावर भर दिलेला आहे. तिरंगी मालिकेत त्यांच्याकडून 276, 275, 337 आणि 342 अशा धावसंख्या उभारण्यात आल्या होत्या.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये आम्ही नेहमीच फलंदाजी करताना 300 पेक्षा जास्त धावा करण्यावर लक्ष केंद्रीत केलेले आहे. हे गोलंदाजांना काही प्रमाणात आधार देते. अलीकडे टी-20 प्रमाणे आम्ही चार फिरकी पर्याय वापरणे पसंत केलेले आहे. मला वाटते की, त्याचीही कुठे तरी मदत झाली आहे, असे कर्णधार हमनप्रीत म्हणाली. संघाचा विचार करता तऊण सलामीवीर प्रतीका रावलचे पारडे पुन्हा एकदा अनुभवी शफाली वर्मापेक्षा जड आहे. रावलने तिरंगी मालिकेत प्रभावित केले, जिथे तिने महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वांत जलदरीत्या 500 धावा पूर्ण करणारी फलंदाज बनून विक्रमांच्या पुस्तकात आपले नाव कोरले.
कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना, फिनिशर रिचा घोष आणि विश्वासार्ह जेमिमा रॉड्रिग्ज आणि हरलीन देओल यांचा समावेश असलेली भारताची वरची आणि मधली फळी जबरदस्त दिसते. त्यासोबत दीप्ती शर्मा आणि अमनजोत कौर यांच्या रुपाने खालच्या फळीतील फलंदाजी कौशल्यात भर पडली आहे आणि गोलंदाजीचा विचार करता भारताकडे बहुतेक संघांना बाद करण्याची ताकद आहे. तथापि, दुखापतींमुळे बाहेर पडलेल्या आघाडीच्या वेगवान गोलंदाज तितस साधू, रेणुका सिंग आणि पूजा वस्त्रकार यांच्या अनुपस्थितीत गोलंदाजी विभागाची पुन्हा एकदा परीक्षा लागेल. वेगवान माऱ्याचे नेतृत्व अनुभवी अऊंधती रे•ाr करेल आणि तिला क्रांती गौड आणि अष्टपैलू खेळाडू अमनजोत कौर आणि सायली गणेश यांची साथ मिळेल.
फिरकी विभागात चांगली भर पडली असून श्रीचरणी आणि राधा यादव ही डावखुरी जोडी अनुभवी ऑफस्पिनर स्नेह राणा आणि दीप्ती शर्मा यांच्यासोबत जबाबदारी उचलेल. राणा आणि दीप्ती या दोघीही मधल्या षटकांमध्ये चांगले नियंत्रण ठेवतात. दरम्यान, इंग्लंड संघात दोन प्रमुख खेळाडूंचे पुनरागमन झालेले आहे. संघाची कर्णधार नॅट सायव्हर-ब्रंट परत आलेली असून कंबरेच्या दुखापतीमुळे गेल्या तीन टी-20 सामन्यांमध्ये ती खेळू शकली नाही. एकदिवसीय सामन्यांच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली गोलंदाज सोफी एक्लेस्टोनही गुडघ्याच्या दुखापतीमुळे मे महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर संघात परतली आहे.
सामन्याची वेळ : (भारतीय वेळेनुसार) संध्याकाळी 5.30 वा.









