वृत्तसंस्था / बर्मिंगहॅम
यजमान इंग्लंड आणि भारत महिला क्रिकेट संघातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटचा सामना येथे शनिवारी खेळविला जाणार आहे. हरमनप्रित कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला क्रिकेट संघाने इंग्लंडमध्ये पहिली मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. या मालिकेत भारत 3-1 असा आघाडीवर असून शनिवारचा शेवटचा सामना जिंकून मालिकेचा शेवट विजयाने करण्यासाठी सज्ज झाला आहे.
या मालिकेत भारतीय महिला संघाने गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तीनही विभागात कामगिरीत सातत्य राखल्याने त्यांना इंग्लंडच्या भूमीवर यजमान संघाविरुद्ध पहिली मालिका जिंकली. या मालिकेतील चौथ्या सामन्यात अरुंधती रे•ाr तसेच राधा यादवच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे भारतीय महिला संघाला या मालिकेत विजयी आघाडी मिळविता आली. टी-20 मालिका संपल्यानंतर उभय संघामध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जात आहे.
इंग्लंडच्या दौऱ्यावर भारताचा पुरूष आणि महिला संघ एकाच कालावधीत गेले असून या दोन्ही संघांची कामगिरी सध्या दर्जेदार होत आहे. गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत एजबेस्टनची दुसरी कसोटी मोठ्या फरकाने जिंकून इंग्लंडशी बरोबरी केली आहे. महिलांच्या टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात राधा यादवने अप्रतिम क्षेत्ररक्षण तसेच गोलंदाजीत दोन गडी बाद केल्याने तिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. दिप्ती शर्मा, राधा यादव, श्री चरणी हे भारतीय महिला संघातील प्रमुख गोलंदाज आहेत. उपकर्णधार स्मृती मानधनाची फलंदाजी चांगलीच बहरत आहे. शेफाली वर्माकडून मानधनाला चांगलीच साथ मिळत आहे. जेमीमा रॉड्रिग्जने या मालिकेत आतापर्यंत चार सामन्यांत 107 धावा जमविल्या आहेत.
इंग्लंडची नियमीत कर्णधार नॅट सिव्हेर ब्रंट दुखापतीमुळे शनिवारच्या सामन्यात खेळू शकणार नाही. स्नायु दुखापतीमुळे तिला चौथ्या सामन्यातही खेळता आले नव्हते. इंग्लंड संघातील सोफीया डंक्लेकडून फलंदाजीत सातत्य दिसत आहे. पण डॅनी वेट हॉज ही अधिक धावा जमवू शकत नसल्याचे दिसून आले आहे. इंग्लंड संघातील वेगवान गोलंदाज बेलने आतापर्यंत या मालिकेत सहा गडी बाद केले आहेत. तर इक्लेस्टोन आणि फिलेर यांनी प्रत्येकी 3 बळी मिळविले आहेत. भारतीय महिला संघ शनिवारचा सामना जिंकून ही मालिका 4-1 अशा फरकाने पटकाविण्यासाठी प्रयत्न करेल. भारतीय संघाचा आत्मविश्वास ही टी-20 मालिका जिंकल्याने अधिकच वाढला असून त्याचा परिणाम आगामी वनडे मालिकेत दिसून येईल.
भारत संघ: हरमनप्रित कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शेफाली वर्मा, रॉड्रिग्ज, रिचा घोष, यास्तीका भाटीया, हर्लिन देवोल, दिप्ती शर्मा, स्नेह राणा, एन. श्री चरणी, सुची उपाध्याय, अमनज्यौत कौर, अरुंधती रे•ाr, क्रांती गौड आणि सायली सातघरे
इंग्लंड : बिमाँट (कर्णधार), अर्लोट, बेल, कॅप्से, डीन, डंक्ले, इक्लेस्टोन, फिलेर, अॅमी जोन्स, स्कोफिल्ड, स्मिथ, डॅनी वेट हॉज, वाँग आणि बाऊचर
सामन्याची वेळ रात्री 11 वाजता









