वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
2025 च्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या प्रो-लीग हॉकी स्पर्धेत सोमवारी येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात सामना खेळविला जाणार आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघाने या स्पर्धेत शनिवारी आयर्लंडचा एकतर्फी पराभव केला होता. आता भारतीय संघ आपली विजयी घोडदौड कायम राखण्यासाठी सज्ज झाला आहे.
या स्पर्धेच्या गुणतक्त्यात भारत सध्या 6 सामन्यातून 12 गुणासह चौथ्या स्थानावर आहे. या स्पर्धेचा मायदेशातील टप्पा आता सोमवारच्या सामन्याने संपुष्टात येणार आहे. इंग्लंडचा पुरुष हॉकी संघ या स्पर्धेत 6 सामन्यातून 13 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंड संघाला यापूर्वीच्या सामन्यात स्पेनकडून मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागल्याने सोमवारच्या सामन्यात हा संघ भारताविरुद्ध कडवी लढत देत विजय मिळविण्यासाठी आतूरलेला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाला नव्या वर्षाच्या हॉकी हंगामात येथील कलिंगा स्टेडियमवर झालेल्या स्पेन आणि जर्मनी विरुद्धच्या सामन्यामध्ये संमिश्र यश मिळाले आहे.
स्पेन संघाने या स्पर्धेत भारताचा 3-1 असा पराभव केला. त्याच प्रमाणे जर्मनीने भारतावर 4-1 अशी मात केली होती. या सामन्यात भारतीय खेळाडूंना पेनल्टी कॉर्नरचा फायदा उठविता आला नव्हता. हरमनप्रित सिंगचे आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात संघात पुनरागमन झाले आणि भारताने या सामन्यात आयर्लंडचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला. इंग्लंड संघातील सॅम वॉर्डने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 9 गोल नोंदविले आहेत. इंग्लंडने या स्पर्धेत आतापर्यंत एकूण 20 गोलांची नोंद केली आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने 2024-25 च्या प्रो-लीग हॉकी हंगामात आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघाकडून 8 गोल करवून घेतले आहेत.









