चौथी कसोटीने उत्साह वाढलेला भारतीय संघ बरोबरी साधण्यास सज्ज, बुमराहच्या जागी आकाश दीप खेळण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ लंडन
भारत आणि इंग्लंडचे खेळाडू आज गुऊवारपासून ओव्हल येथे सुरू होणाऱ्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात त्यांचे शरीर थकलेले असले, तरी पूर्णपणे झोकून देऊन देऊन खेळतील. यामुळे एक जोरदार लढत पाहायला मिळेल आणि पाहण्याजोगी मालिकेची समाप्ती योग्यरीत्या होईल असे चित्र दिसून येत आहे.
प्रेक्षकांच्या गर्दीत खेळली गेलेली ही मालिका कसोटी क्रिकेटच्या प्रचाराच्या दृष्टीने एक परिपूर्ण साधन ठरले आहे. पाचव्या दिवशीच्या शेवटच्या सत्रापर्यंत चारही सामने चालले. त्याशिवाय यादरम्यान उडालेल्या शाब्दिक चकमकीही विसरता येणार नाहीत. यामुळे सर्व कसोटीप्रेमी चाहत्यांसाठी मालिका पुरेशी मसालेदार झालेली आहे. आहे. शुभमन गिलने लॉर्ड्सवर झॅक क्रॉलीवर जाणूनबुजून वेळ वाया घालविल्याबद्दल व्यक्त केलेला संताप आणि रवींद्र जडेजाने शेवटच्या दिवशी बेन स्टोक्सला चिडचिडे बनविताना खेळ संपविण्यास दिलेला नकार आदींचा यात समावेश होतो. भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने ओव्हल क्युरेटर ली फोर्टिसशी घातलेल्या वादामुळे परिस्थिती आणखी भडकली आहे.
गिल गावस्करच्या विक्रमाजवळ
या पार्श्वभूमीवर आणि जसप्रीत बुमराह हा पाठीमागे आधाराशी नसताना गंभीरच्या संघासाठी ही ‘करो वा मरो’ची वेळ बनली आहे. बेन स्टोक्सच्या प्रेरणादायी नेतृत्वाखाली इंग्लंडने तऊण आणि उत्साही भारतावर 2-1 अशी आघाडी घेतली आहे. नवीन कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघाने सर्व अपेक्षा पार केल्या आहेत. मोठ्या संक्रमणातून जात असलेल्या संघाचा कर्णधार म्हणून पहिल्याच मालिकेत गिलने आघाडीवर राहून 722 धावा केल्या आहेत आणि सुनील गावस्करच्या भारतीय संघाकडून मालिकेत सर्वाधिक धावा काढण्याच्या विक्रमापासून तो फक्त 52 धावा दूर आहे. तर गावस्करचा कसोटी मालिकेत (1978-79 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध) भारतीय कर्णधार या नात्याने सर्वाधिक धावा काढण्याचा विक्रम (732 धावा) मागे टाकण्यासाठी त्याला आणखी 11 धावांची आवश्यकता आहे.
25 वर्षीय गिलने आतापर्यंत चार शतके झळकावली आहेत, ज्यात ओल्ड ट्रॅफर्डवरील मागील कसोटीतील एक द्विशतक आणि एक सामना वाचवणाऱ्या 103 धावांच्या खेळीचा समावेश आहे. तीन डावांमध्ये कमी कामगिरी केल्यानंतर गिलने मँचेस्टरमध्ये त्याच्या कारकिर्दीतील सर्वात निर्णायक खेळी केली आणि केवळ फलंदाज म्हणूनच नव्हे, तर कर्णधार म्हणूनही त्याची प्रतिष्ठा वाढवली. जवळजवळ निराशाजनक परिस्थितीतून सामना बरोबरीत सोडविण्यात मोठी भूमिका बजावल्यानंतर गिल आणि त्याचा संघ अंतिम कसोटीत उत्साहित होऊन उतरेल. परंतु त्यांच्यासमोर पोकळी भरून काढण्याचे आव्हान राहील.
साई सुदर्शन, जैस्वालकडून अधिक अपेक्षा
गिलप्रमाणेच स्टोक्सनेही कर्णधारास साजेशी कामगिरी करत नेतृत्व केले आहे आणि अनेक अडचणींना तोंड देऊन तसेच दुखापतग्रस्त शरीराच्या मर्यादा ओलांडून खेळ केलेला आहे. त्यांचे जलद गोलंदाज देखील थकलेले असताना इंग्लंडने जेमी ओव्हरटनला संघात समाविष्ट केले आहे. 511 धावांसह के. एल. राहुल हा वरच्या फळीत सातत्याचे चांगले उदाहरण बनला आहे. परंतु यशस्वी जयस्वाल आणि तिसऱ्या क्रमांकावर साई सुदर्शनकडून अधिक अपेक्षा केल्या जातील. ओव्हलवरील खेळपट्टी ही फलंदाजीस अनुकूल मानली जाते.
जखमी रिषभ पंतच्या अनुपस्थितीत चौथ्या कसोटीत इंग्लंडला विजयापासून रोखणाऱ्या नाबाद शतकांमुळे वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा हे पहिल्या सहामध्ये स्थान मिळवतील अशी अपेक्षा आहे. भारतीय संघ व्यवस्थापन आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजीचे पर्याय उपलब्ध ठेवण्यावर ठाम विश्वास ठेवते आणि त्यामुळे कुलदीप यादवला समाविष्ट करण्यासाठी सतत मागणी केली जात असली, तरी त्याला पुन्हा एकदा ‘प्लेइंग इलेव्हन’मधून वगळले जाऊ शकते.
कुलदीपला पुन्हा संधी न मिळण्याची शक्यता
ध्रुव जुरेल यष्टीरक्षण करेल आणि पंतच्या अनुपस्थितीत सातव्या क्रमांकावर फलंदाजी करू शकेल. शार्दुल ठाकूर त्याच्या कर्णधाराचा आत्मविश्वास पूर्णपणे कमावू शकलेला नसला, तरी तो त्याचे आठवे स्थान कायम ठेवू शकेल. पाचव्या कसोटीपूर्वी फलंदाजी प्रशिक्षक सीतांशू कोटक यांच्या टिपण्या पाहता भारत आतापर्यंतची रचना कायम ठेवेल. ‘सामना जिंकण्यासाठी तुम्हाला फलंदाजी आणि गोलंदाजी अशा दोन्हीचे संतुलन पाहावे लागते. कारण जसे तुम्हाला 20 बळी घ्यावे लागतात त्याचप्रमाणे 550-600 धावा करणे देखील तितकेच महत्त्वाचे असते’, असे कोटक म्हणाले. ‘एकंदरित जर तुम्ही 6 गोलंदाजांसह खेळलात तर काही गोलंदाज अपेक्षेनुसार कामगिरी न करणारे राहतील. म्हणून जर सहावा गोलंदाज अष्टपैलू असेल, तर तो गोलंदाजीबरोबर फलंदाजीतही योगदान देऊ शकतो हे तुम्हाला माहिती असते’, असे त्यांनी पुढे सांगितले.
‘जर तो शुद्ध गोलंदाज असेल आणि त्याने अपेक्षेनुरुप कामगिरी केली नसेल, तर सामन्यानंतर जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता, तेव्हा तुम्हाला अतिरिक्त गोलंदाज वा फलंदाज खेळविल्यास फरक पडला असता असे वाटेल’, असे कोटकने प्रशिक्षक गंभीरच्या विचारसरणीला पूरक असे विचार मांडताना सांगितले. गोलंदाजीच्या बाबतीत आकाश दीप अंतिम 11 खेळाडूंच्या संघात जसप्रीत बुमराहची जागा घेण्याची अपेक्षा आहे आणि बुमराहने त्याचे शरीर धोक्यात घालू नये असा सल्ला देण्यात आला आहे. मोहम्मद सिराज माऱ्याचा नेता असेल आणि तिसऱ्या वेगवान गोलंदाजाची जागा प्रसिद्ध कृष्णा किंवा अर्शदीप सिंग यांच्यापैकी एकाला मिळेल. अर्शदीप त्याच्या कसोटी पदार्पणाची धीराने वाट पाहत आहे. येथे खेळलेल्या शेवटच्या काउंटी सामन्यात सरे संघाने 800 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. परंतु या जबरदस्त दबावाच्या सामन्यात खेळपट्टी कशी वागते हे पाहावे लागेल. इंग्लंडने मंगळवारी त्यांचे सुऊवातीचे सराव सत्र रद्द केले आणि फक्त प्रशिक्षक ब्रँडन मॅकलम खेळपट्टी पाहण्यासाठी उतरले.
संघ-भारत : शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, के. एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू ईश्वरन, कऊण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, कुलदीप यादव, अंशुल कंबोज, अर्शदीप सिंग, एन. जगदीशन.
इंग्लंड-ऑली पोप (कर्णधार), झॅक क्रॉली, बेन डकेट, ज्यो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टंग.
सामन्याची वेळ : दुपारी 3:30 वा.









