वृत्तसंस्था/ पोश्चेस्ट्रूम
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या कनिष्ठ महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत मंगळवारी भारत आणि इंग्लंड यांच्यात कांस्यपदकासाठी लढत होणार आहे.
या स्पर्धेत 2013 साली भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाने कांस्यपदक मिळविले होते. पुन्हा यावेळी भारतीय संघ याची पुनरावृत्ती करण्यासाठी सज्ज झाला आहे. सलिमा टेटेच्या नेतृत्वाखाली भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाला रविवारी झालेल्या उपांत्य सामन्यात बलाढय़ नेदरलँडस्कडून 0-3 अशा गोलफरकाने पराभव पत्करावा लागला होता. या उपांत्य सामन्यात भारतीय संघाला गोल करण्याच्या अनेक संधी उपलब्ध होवूनही त्याचा लाभ घेता आला नसल्याने कर्णधार टेटेने नाराजी व्यक्त केली पण भारतीय संघ आता मंगळवारी होणाऱया कांस्यपदकाच्या लढतीसाठी मोठय़ा जोमाने खेळ करेल, असा विश्वास तिने व्यक्त केला. रविवारी झालेल्या दुसऱया उपांत्य सामन्यात जर्मनीने इंग्लंडचा 8-0 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. ब गटात आघाडीवर असलेल्या इंग्लंड संघाने दक्षिण आफ्रिका आणि त्यानंतर आयर्लंडचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. त्यानंतर इंग्लंडने उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेवर 2-1 असा विजय मिळवित उपांत्य फेरी गाठली होती. भारतीय कनिष्ठ महिला संघाने या स्पर्धेत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारताना एकही सामना गमविला नव्हता.









