वृत्तसंस्था/ डुसेलडार्फ, जर्मनी
भारताच्या कनिष्ठ महिला हॉकी संघाने येथे सुरू असलेल्या चौरंग हॉकी स्पर्धेतील सामन्यात पिछाडी भरून काढत इंग्लंडला 3-3 असे गोलबरोबरीत रोखले.
हिना बानो (6 वे मिनिट), रुतुजा दादासो पिसाळ (49) व मुमताज खान (53) यांनी नोंदवले तर इंग्लंडचे गोल ली हुरे मार्था (4 व 19) व अलेक्झांडर बेथ (9) यांनी गोल केले. इंग्लंडने या सामन्यात जोरदार सुरुवात करताना चौथ्याच मिनिटाला पहिले यश मिळविले. मार्थाने शानदार मैदानी गोल नोंदवत आघाडी घेतली. भारतानेही लगेचच जोरदार प्रत्युत्तर देत बरोबरी साधली. हिनानेही सहाव्या मिनिटाला मैदानी गोल करून भारताला बरोबरी साधून दिली. अॅलेक्झांडर बेथने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून इंग्लंडची आघाडी 2-1 अशी केली. पहिल्या सत्राअखेर त्यांची ही आघाडी कायम राहिली.
भारताने नंतर वारंवार चढाया करीत बरोबरीसाठी प्रयत्न केले. मात्र इंग्लंडनेच आपली आघाडी आणखी वाढविली. मार्थाने वैयक्तिक दुसरा गोल नोंदवत संघाला 3-1 अशी बढत मिळवून दिली. मध्यंतराला त्यांनी ही आघाडी राखली होती. तिसऱ्या सत्रात मात्र एकही गोल नोंदवला गेला नाही. चौथ्या सत्रात मात्र भारताने आपले आक्रमण आणखी तेज केले आणि त्यात त्यांना यशही आले. रुतुजाने 49 व्या मिनिटाला शानदार मैदानी गोल नोंदवत इंग्लंडची आघाडी कमी केली आणि 53 व्या मिनिटाला मुमताजने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवत भारताला 3-3 अशी बरोबरी साधून दिली. भारताचा पुढील सामना स्पेनविरुद्ध आज मंगळवारी होणार आहे.









