डेव्हिस चषक : भारत 2-0 ने आघाडीवर, रामकुमार रामनाथन, एन. श्रीराम बालाजी एकेरीत विजयी
वृत्तसंस्था /इस्लामाबाद
भारताने डेव्हिस चषक विश्व गट-1 च्या प्ले-ऑफ लढतीत पाकिस्तानचे आव्हान पहिल्या दिवशीच मोडून काढले असून शनिवारी रामकुमार रामनाथन आणि एन. श्रीराम बालाजी यांनी उच्च दबावाच्या लढतींत मुसंडी मारत 2-0 ने आघाडी मिळवून दिली. असाम-उल-हक कुरेशीने सलामीच्या एकेरी सामन्यामध्ये आपले सर्वस्व पणाला लावले होते. पण सामन्याची तीव्रता आणि खडतर परिस्थिती यामुळे त्याच्यावर परिणाम झाला आणि तिसऱ्या सेटमध्ये त्याच्या धेडशिरेला दुखापत झाली, ज्यामुळे पहिल्या दोन सेट्समध्ये विलक्षण चुरस पाहायला मिळालेल्या या सामन्याची त्याच पद्धतीने त्याला समाप्ती करता आली नाही. रामकुमारने सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली आणि दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करत 6-7 (3), 7-6 (4), 6-0 असा विजय मिळवला. 43 वर्षीय कुरेशीने सामन्यात 10 डबल फॉल्ट केले. रामकुमारची भक्कम सर्व्हिस हे सामन्याच्या निकालाच्या दृष्टीने महत्त्वाचे राहिले. दुसऱ्या सेटच्या आठव्या गेममध्ये 15-40 असे पिछाडीवर असताना रामकुमारने स्वत:ला कठीण परिस्थितीतून बाहेर काढले आणि नंतर सामन्यात मागे वळून पाहिले नाही. या सामन्यात त्याने 20 बिनतोड सर्व्हिस केल्या.
बालाजी या दुहेरीत खेळण्याची खसियत असलेल्या खेळाडूला अकील खानने आव्हान दिले होते. पण पावसाने ग्रासलेल्या दुसऱ्या एकेरीत भारतीय खेळाडूने पाकिस्तानच्या अनुभवी खेळाडूचा 7-5, 6-3 असा पराभव केला. या सामन्यावर बालाजीची पकड राहिली. त्याने अकीलच्या सर्व्हिसला दोन्ही सेटमध्ये एकदा भेदले. त्याच्या हालचाल, दमदार सर्व्हिस, ड्रॉप शॉट्सचा वापर या सर्वांनी शेवटी त्याला आरामात विजय मिळवून दिला. भारत आता जागतिक गट-1 मध्ये जाण्यापासून एक विजय दूर आहे. युकी भांब्री आणि साकेथ मायनेनी आता आज रविवारी होणाऱ्या तिसऱ्या लढतीत मुझम्मिल मुर्तझा आणि बरकत उल्ला यांचा सामना करणार असून त्याचवेळी जागतिक गट-1 मधील भारताच्या प्रवेशावर शिक्कामोर्तब होण्याची अपेक्षा आहे. गोठवणाऱ्या थंडीमुळे शनिवारी खेळाडूंसाठी परिस्थिती आव्हानात्मक झाली होती.









