पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष सीसी यांच्यात चर्चेनंतर झाली घोषणा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारत आणि ईजिप्त यांच्यात धोरणात्मक भागिदारी झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ईजिप्तचे अध्यक्ष अब्देल सीसी यांनी त्यापूर्वी एकमेकांशी विविध विषयांवर चर्चा केली. सीसी मंगळवारी भारताच्या दौऱयावर आले असून ते 26 जानेवारीच्या संचलनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत. दोन्ही नेत्यांनी चर्चेनंतर संयुक्त निवेदनही प्रसिद्धीस दिले आहे.
भारत आणि ईजिप्त यांच्यात इतिहास काळापासून संबंध आहेत. या संबंधांना केल्या 50 वर्षांमध्ये अधिकच दृढता मिळाली आहे. आता दोन्ही देशांनी त्यांच्यातील संबंधांना धोरणात्मक भागिदारीचे स्वरुप देण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्यासंबंधीचा करारही करण्यात येईल. बुधवारी दोन्ही देशांमध्ये पाच सामंजस्य करारांवर स्वाक्षऱया करण्यात आल्या. युवक कल्याण, सायबर सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान, सार्वजनिक माहिती आणि संस्कृती या विषयांवर हे सामंजस्य करार करण्यात आले. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील.
दोन्ही नेत्यांची वक्तव्ये
भारताने ईजिप्तला जी-20 चा विशेष अतिथी देश म्हणून आमंत्रित पेले आहे. भारत-ईजिप्त यांच्यातील धोरणात्मक भागिदारीच्या माध्यमातून सहकार्याची दीर्घकालीन संरचना निर्माण केली जाईल. राजकारण, संरक्षण, अर्थ आणि विज्ञान इत्यादी विषयांवर दोन्ही देशांमध्ये परस्पर सहकार्य वाढविले जाईल. दोन्ही देशांचे हे सहकार्य एकमेकांना पूरक ठरेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.
पुराणकाळापासून संबंध
सीसी यांनी त्यांच्या वक्तव्यात भारत आणि ईजिप्त यांच्यातील पुराणकाळापासून असलेल्या दृढ संबंधांचा उल्लेख केला. आताही भारताच्या नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात ईजिप्तमध्ये पर्यटनासाठी यावे. दोन्ही देशांमध्ये शक्य तितक्या सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढण्याची आवश्यकता आहे. आयात-निर्यात, व्यापार, गुंतवणूक, आणि सांस्कृतिक क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी दोन्ही देशांना मोठी संधी आहे. याला लाभ घेतला जाईल, असे प्रतिपादन सीसी यांनी नंतर केले.
पंतप्रधान मोदींना निमंत्रण
सीसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ईजिप्त भेटीचे निमंत्रण दिले. दोन्ही देशांमध्ये वायूसंचार अधिक प्रमाणात व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गणतंत्र दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आमंत्रित केल्यामुळे त्यांनी भारताचे आभार मानले. भारत आणि ईजिप्त यांनी अनेक वर्षांपूर्वी गटनिरपेक्ष चळवळीची स्थापना केली होती. या आठवणींनाही उजाळा देण्यात आला.









