भारतीय विमानाने इजिप्तच्या विमानात भरले इंधन
वृत्तसंस्था/ कैरो
भारतीय वायुदलाच्या आयएल-78 या हवेतून हवेत इंधन भरणाऱ्या विमानाने ब्राइट स्टार-23 युद्धाभ्यासादरम्यान इजिप्तच्या वायुदलाच्या विमानात इंधन भरले आहे. यासंबंधीची माहिती भारतीय वायुदलाकडून रविवारी देण्यात आली.
ब्राइट स्टार युद्धाभ्यासादरम्यान इजिप्तसोबतच्या मैत्रीचे आकाशात प्रदर्शन करत भारतीय वायुलाच्या आयएल-78 विमानने इजिप्तच्या विमानात इंधन भरले असल्याचे सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत म्हटले गेले आहे. जागतिक संक्षण सहकार्याला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत भारतीय वायुदलाची एक तुकडी ब्राइट स्टार-23 युद्धाभ्यासात सामील होण्यासाठी इजिप्तच्या वायुतळावर पोहोचली आहे. कैरोत इजिप्तच्या वायुदलाच्या तळावर लँडिंग, पुढील 3 आठवड्यांसाठी हेच आमचे घर असे वायुदलाने सोशल मीडिया पोस्टमध्ये नमूद केले आहे.
भारतीय वायुदलाच्या तुकडीने कैरो येथील वायुतळावर आयोजित द्विवार्षिक बहुपक्षीय युद्धाभ्यासात भाग घेतला आहे. हा युद्धाभ्यास 16 सप्टेंबर रोजी संपणार आहे. या युद्धाभ्यासात अमेरिका, सौदी अरेबिया, ग्रीस आणि कतारच्या वायुदलाने देखील भाग घेतला आहे.
भारतीय वायुदलाच्या तुकडीत 5 मिग-29, 2 आयएल-78, दोन सी-130 आणि दोन सी-17 विमानांचा समावेश आहे. भारतीय वायुदलाच्या गरुड पथकासह वायुसैनिक या युद्धाभ्यासात सहभागी झाले आहेत.
जागतिक संरक्षण सहकार्य वाढविण्यासह संयुक्त मोहिमांची योजना आखणे हा या युद्धाभ्यासातील सहभागाचा उद्देश आहे. वायु योद्ध्यांदरम्यान मजबूत संबंधांना चालना देण्यासोबत अशाप्रकारचे युद्धाभ्यास संबंधित देशांदरम्यान रणनीतिक संबंध वृद्धींगत करण्याची संधी प्रदान करणार असल्याचे वायुदलाने म्हटले आहे.
भारत आणि इजिप्त यांचे संबंध अत्यंत दृढ आहेत. दोन्ही देशांनी 1960 च्या दशकात संयुक्त स्वरुपात एअरो-इंजिन आणि विमानाचा विकास करण्याचा प्रकल्प हाती घेतला होता. तसेच भारताकडून इजिप्तच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यात येते. भारताचे पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांनी अलिकडेच इजिप्तचा दौरा केला होता. या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिकच मजबूत झाले आहेत. दोन्ही देशांनी स्वत:च्या सशस्त्र दलांदरम्यान नियमित सरावासोबत स्वत:च्या संयुक्त प्रशिक्षणालाही बळ दिले आहे.









