वृत्तसंस्था/ /कोलकाता
निराश झालेले दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक रॉब वॉल्टर हे त्यांचा संघ पुन्हा एकदा अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरल्याने विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना पाहणार नाहीत. परंतु स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संघ असलेला भारत उद्या रविवारी सदर प्रतिष्ठित चषक जिंकण्यासाठी पात्र संघ आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. सलग 10 विजयांच्या जोरावर भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली असून स्पर्धेत आतापर्यंत ते अजिंक्य राहिले आहेत. यजमानांचा अहमदाबाद येथे होणार असलेल्या अंतिम लढतीत पाच वेळचे विजेते ऑस्ट्रेलियाशी सामना होणार आहे.
प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर मी अंतिम सामना पाहण्याची एक टक्के शक्यता आहे आणि आणखी स्पष्टपपणे सांगायचे झाल्यास मला खरोखर पर्वा नाही, असे गुऊवारी येथे झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाने तीन गडी राखून पराभव केल्यानंतर वॉल्टर म्हणाले. मात्र भारत घरच्या मैदानावर चषक जिंकण्यास पात्र आहे, असे त्यांनी लगेच पुढे सांगितले. विश्वचषक स्पर्धा भारतात आयोजिण्यात आलेली आहे आणि यजमान देशाने विश्वचषक जिंकणे नेहमीच चांगले असते, असे ते म्हणाले.
ऑस्ट्रेलियन चेंज रूममध्ये मला बरेच मित्र मिळाले आहेत, त्यामुळे त्यांच्यापैकी काही जणांबद्दल, विशेषत: प्रशिक्षकांबद्दल माझ्या मनात आपुलकीची भावना आहे, असेही वॉल्टर यांनी सांगितले. ‘परंतु आम्ही येथे भारताविरुद्ध मागील खेपेस खेळलो तेव्हा त्यांना ज्या प्रकारे पाठिंबा मिळाला तसेच चाहते ज्या प्रकारे संघामागे उभे राहिले आणि घरच्या मैदानावर भारत विश्वचषक जिंकण्याची त्यांना जी मोठी आशा आणि संघाला प्रेरणा आहे ते पाहता मला वाटते की, भारत जिंकणेच योग्य ठरेल, असे ते म्हणाले. भारत हा स्पर्धेतील सर्वोत्तम संघ आहे आणि ते सर्वोत्तम क्रिकेट खेळले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
वॉल्टरनी फॉर्म नसलेल्या कर्णधार टेंबा बवुमाच्या वादग्रस्त निवडीचेही समर्थन केले, जो 100 टक्के तंदुरुस्त नसतानाही उपांत्य सामन्यात खेळला. त्याने संघाचे अविश्वसनीय पद्धतीने नेतृत्व केले. मैदानावर सभोवतालच्या वरिष्ठ खेळाडूंसह तो धोरणात्मकदृष्ट्या ज्या पद्धतीने वावरला ते उत्तम होते, असे ते म्हणाले. क्षेत्ररक्षणातील विविध बदलांद्वारे दबाव निर्माण केला गेला. मला वाटते की, त्या धावसंख्येचा बचाव करण्याचा हा एक उत्कृष्ट प्रयत्न होता, असे मत त्यांनी व्यक्त केले.
“कधी कधी जेव्हा तुमच्या स्वत:च्या हातून चांगली कामगिरी होत नाही आणि तुमच्या आजुबाजूचे अन्य फलंदाज चांगली कामगिरी करत असतात तेव्हा स्पर्धेत वाटचाल करणे सोपे नसते. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही एक संघ म्हणून खेळलो. बवुमाने नेतृत्व सांभाळत आम्हाला स्पर्धेत इथवर पोहोचविले. मला वाटते की, लोक ते विसरतात. म्हणून तो या संघात किती महत्त्वाचा आहे आणि त्याच्या प्रयत्नांचा तसेच त्याने संपूर्ण स्पर्धेत ज्या प्रकारे नेतृत्व केले त्याचा मला किती अभिमान आहे, याची जाणीव मला करून द्यायची होती. मी बवुमालाही मला त्याचा किती अभिमान वाटतो ते सांगितलेले आहे, असे वॉल्टर यांनी पुढे सांगितले.









