वृत्तसंस्था/ जोहोर बहरू, मलेशिया
येथे सुरू असलेल्या सुलतान जोहोर चषक कनिष्ठ पुरुष हॉकी स्पर्धेत शेवटच्या गटसाखळी सामन्यात भारताने यजमान मलेशियाचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळविले.
गुरजोत सिंगने 22 व्या मिनिटाला तर सौरभ आनंद कुशवाहाने 48 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर भारताचे गोल नोंदवले. शनिवारी भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. मलेशियाचा एकमेव गोल 43 व्या मिनिटाला नावीनेश पनिकरने नोंदवला. भारताने आतापर्यंत बारा वेळा या स्पर्धेत भाग घेतला आणि त्यापैकी विक्रमी आठव्या वेळी अंतिम फेरी गाठली आहे.
येथील सामन्यात पावसामुळे सामना उशिरा सुरू झाल्यानंतर ओलसर वातावरणात दोन्ही संघांकडून अडखळत सुरुवात झाली. लांबवरून हवेतून चेंडू पास करून मलेशियाला बेसावध पकडण्यासाठी भारताने अनेकदा प्रयत्न केले. पण भारताला त्यात फारसे यश मिळाले नाही. मैदानाची स्थिती बऱ्यापैकी सुधारल्यानंतर भारताने दुसऱ्या सत्रात आक्रमक सुरुवात केली आणि लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. त्यापैकी एकावर भारत गोल नेंदवण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण मलेशियन गोलरक्षक हाझिक हैरुलने पहिला प्रयत्न फोल ठरविला तर अरायजीत हुंदालने रिबाऊंड मारलेल्या दुसऱ्या प्रयत्नात चेंडू क्रॉसबारला लागून बाहेर गेला. मात्र 22 व्या मिनिटाला गुरजोत सिंगने रिबाऊंड झालेल्या चेंडूला हलके टॅप करून भारताला आघाडी मिळवून दिली. त्याआधी हा पेनल्टी कॉर्नर फटका मलेशियाच्या गोलरक्षकाने अडवला होता. पण तो रिबाऊंड झाल्यानंतर त्याचा लाभ गुरजोत उठविला. मध्यंतराला भारताने 1-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र भारताने अनेक संधी दवडल्या होत्या. पहिल्या दोन सत्रांत त्यांना 9 पेनल्टी कॉर्नर्स मिळाले होते, त्यापैकी फक्त एकावर भारताला यश मिळाले.
तिसऱ्या सत्रात भारताने मलेशियन बचावफळीवर दडपण कायम ठेवले. मात्र 35 व्या मिनिटाला त्यांच्या गोलरक्षकाने अप्रतिम बचाव करीत आणखी गोल वाचविला. 43 व्या मिनिटाला मात्र मलेशियाला पहिले यश मिळाले. नावीनेशने हा गोल करून 1-1 अशी बरोबरी साधून दिली. पाचच मिनिटांनंतर भारताने पुन्हा आघाडी घेतली. पेनल्टी कॉर्नरवर रिबाऊंड झालेला चेंडू ताब्यात घेत कुशवाहाने हा गोल नोंदवला. शेवटपर्यंत भारताने ही आघाडी टिकवून ठेवत विजय साकार केला.









