एफआयएच हॉकी प्रो लीग : 3-1 गोलफरकाने विजय
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
भारतीय हॉकी संघाने एफआयएच प्रो लीगमधील दुसऱया सामन्यातही अननुभवी जर्मनीचा 3-1 असा पराभव करून गुणतक्त्यातील अग्रस्थान आणखी भक्कम केले.
या सामन्यात सुखजीत सिंग (19 वे मिनिट), वरुण कुमार (41), अभिषेक (54) यांनी गोल भारताचे गोल नोंदवले तर जर्मनीचा एकमेव गोल अँटोन बोकेलने 45 व्या मिनिटाला नोंदवला. भारताने पहिल्या सामन्यात याच संघावर 3-0 अशी मात केली होती. भारताने आता 12 सामन्यांतून 27 गुण घेत पहिले स्थान बळकट केले आहे तर दुसऱया स्थानावरील जर्मनी 17 गुणांवरच राहिले आहे.
जर्मनी संघात युवा खेळाडूंचा भरणा असून सुमारे डझनभर खेळाडूंनी या सामन्यांतून वरिष्ठ संघात पदार्पण केले. त्यांच्या अननुभवाचा फायदा घेत भारताने या सामन्यात जर्मनीवर पूर्ण वर्चस्व गाजविले. पहिल्या सत्रात भारताने काही वेळा चांगल्या चाली करीत जर्मनीच्या हद्दीत प्रवेश केला. पण मिळालेल्या संधीचा फायदा त्यांना घेता आला नाही. दुसऱया सत्रातील चौथ्या मिनिटाला सुखजीतने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने मैदानी गोल नोंदवत भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मनप्रीत सिंग व निलकांता शर्मा यांनी रचलेल्या चालीत सर्कलमध्ये चेंडू मिळाल्यावर सुखजीतने हा गोल नोंदवला. त्याचा हा केवळ दुसरा आंतरराष्ट्रीय गोल आहे. आघाडीने प्रोत्साहित झाल्याने भारतीय खेळाडूंनी आक्रमण तेज केले. या सत्रातील शेवटच्या काही मिनिटात मात्र जर्मनीने भारतावर दडपण आणले होते. त्यांनी गोलच्या दिशेने एक फटका मारला होता, पण गोलरक्षक कृशन बहादुर पाठकने तो अचूक थोपविला. पूर्वार्धात भारताने बॉल पझेशनच्या बाबतीत पूर्ण वर्चस्व ठेवले आणि गोलच्या दिशेने तीन फटके मारले.
उत्तरार्धात तिसऱयाच मिनिटाला भारताने पहिला पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण हरमनप्रीतचा फटका जर्मनीचा गोलरक्षक जीन डॅनेबर्गने अचूक अडविल्याने तो वाया गेला. 41 व्या मिनिटाला शिलानंद लाक्राने पेनल्टी कॉर्नर मिळविला आणि त्यावर वरुण कुमारने अचूक गोल नोंदवत भारताची आघाडी वाढवली. चारच मिनिटांनंतर जर्मनीने पहिला गोल नोंदवला. गोलरक्षक पीआर श्रीजेश बराच पुढे आल्यानंतर अँटोन बोकेलने रिकाम्या गोलपोस्टमध्ये चेंडू मारत हा गोल केला. 54 व्या मिनिटाला अभिषेकने सर्कलच्या डाव्या बाजूने जोरदार फटका मारत ही आघाडी 3-1 अशी केली. यासाठी त्याला हरमनप्रीतकडून लाँग पास मिळाला होता. शेवटच्या काही मिनिटांत जर्मनीने गोलसाठी जोरदार प्रयत्न करीत पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण पाठकने अप्रतिम गोलरक्षण करीत त्यांची ही संधी वाया घालवली. या लढतीने भारताची प्रो लीगमधील मायदेशात होणारी मोहीम संपली असून यापुढील लढत बेल्जियमविरुद्ध जूनमध्ये त्यांच्याच देशात होणार आहे.









