वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारत ‘ड’ संघाने शुक्रवारी अनंतपूर येथे दुलीप ट्रॉफी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आपली परिस्थिती भक्कम बनविताना भारत ‘क’विऊद्धची आघाडी 202 धावांवर नेली. अय्यरने 44 चेंडूंत 54 आणि देवदत्त पडिक्कलने 70 चेंडूंत 56 धावा केल्या. त्यामुळे बऱ्यापैकी धावसंख्या उभारण्यास मदत झाली. त्यांचे अक्षर पटेल आणि हर्षित राणा सध्या क्रिझवर असून खेळ संपला तेव्हा भारत ‘ड’च्या 8 बाद 206 धावा झाल्या होत्या.
अय्यरच्या डावात नऊ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता, तर पडिक्कलने आठ चौकार लगावले. त्यांच्या 126 धावांच्या भागीदारीने सुऊवातीच्या पडझडीनंतर संघाचा डाव स्थिरावला. भारत ‘क’च्या मानव सुतारने 15 षटकांत 30 धावा देऊन 5 बळी घेतले. त्यात पडिक्कल आणि रिकी भुई यांच्या बळींचा समावेश होता. सध्या क्रीझवर असलेल्या हर्षित राणाने अद्याप खाते उघडणे बाकी आहे, तर अक्षरने 37 चेंडूंत 11 धावा केलेल्या आहेत.
भारत ‘ड’ संघाच्या डावाची सुऊवात डळमळीत राहिली आणि सलामीवीर अथर्व तायडे आणि यश दुबे यांना अवघ्या 40 धावांत त्यांनी गमावले. मात्र, अय्यर आणि पडिक्कल यांच्या भागीदारीने स्थैर्य आणले. सुतारने पायचित करण्यापूर्वी रिकी भुईने 91 चेंडूंत 44 धावांचे योगदान दिले. तत्पूर्वी, 4 बाद 91 वरून खेळण्यास सुरुवात केलेल्या भारत ‘क’ संघाचा डाव 168 धावांवर आटोपला. हर्षित राणाने 33 धावांत 4, तर अक्षर पटेलने 46 धावांत 2 बळी घेतले.
भारत ‘क’च्या बाबा इंद्रजितने 149 चेंडूंत 72 धावा केल्या, ज्यामुळे तो संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. अभिषेक पोरेलने 61 चेंडूंत 34 धावा जोडल्या. असे असले, तरी युवा डावखुरा फिरकीपटू मानव सुतार हा भारत ‘क’साठी दिवसाचा स्टार राहिला. त्याने 15 षटकांत 5 बळी मिळविले. भारत ‘ड’ला 202 धावांची आघाडी मिळालेली असल्याने सामना आज तिसऱ्या दिवशी रंजक ठरणार आहे. कारण दोन्ही संघ वर्चस्वासाठी प्रयत्नशील राहणार आहेत.









