भाजप विरोधी पक्षांची इंडिया आघाडीमध्ये महाराष्ट्रांमधील जागांसाठी काँग्रेस पक्षाला अनेक कठिण गोष्टींना सामोरे जावे लागेल असा संकेत देताना, शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेस पक्षाने जागावाटपाची सुरवात “शून्या” पासूनच सुरू कराव्या लागतील असे म्हटले आहे. 2019 मध्ये काँग्रेसने राज्यातील एकही मतदारसंघ जिंकला नसल्याने संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पाच राज्यांच्या निकालानंतर इंडिया आघाडीच्या सदस्य पक्षांनी 2024 च्या निवडणुकांसाठी पुन्हा एकदा बैठक घेतली. दिल्लीमध्ये झालेल्या या बैठकीमध्ये राज्याराज्यांमधील जागावाटपांवर प्राथमिक चर्चा झाली. आज माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी काँग्रेसला पुन्हा एकदा जागावाटपावरून डिवचले असून जागावाटपाच्या बैठकीमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रात शुन्यापासून सुरवात करावी लागेल असे म्हटले आहे.
यावेळी ते म्हणाले, “हा महाराष्ट्र आहे आणि इथे शिवसेना सर्वात मोठा पक्ष आहे. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष आहे…राहुल गांधी, सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह निर्णय घेणाऱ्या काँग्रेसच्या अनेक नेत्यांशी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे सकारात्मक चर्चा करत आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेना नेहमीच 23 जागांवर लढत असते असे आम्ही नेहमी म्हणत आलो आहोत. इंडिया आघाडीच्या बैठकीत शिवसेनेने जिंकलेल्या जागांवर नंतर चर्चा करू.” असेही खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, “2019 च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला महाराष्ट्रात एकही जागा जिंकता आली नाही. त्यामुळे त्यांना जागावाटपाची चर्चा शून्यापासूनच करावी लागेल, पण काँग्रेस हा आमचा महाविकास आघाडीचा महत्त्वाचा सहयोगी पक्ष आहे.” असेही ते म्हणाले.