वृत्तसंस्था / ऍमस्टलव्हीन (हालंड)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या महिलांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत मंगळवारी भारत आणि चीन यांच्यात सामना खेळविला जाणार आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑलिंपिक कास्यपदक विजेत्या इंग्लंडला 1-1 असे बरोबरीत रोखले होते.
रविवारी या स्पर्धेतील ब गटातील भारत आणि इंग्लंड यांच्यातील सलामीचा सामना खेळविला गेला होता. या सामन्यात भारताच्या दीप ग्रेस एक्का, निकी प्रधान, गुरजित कौर आणि उदीता यांची कामगिरी दर्जेदार झाली होती. या संपूर्ण सामन्यात इंग्लंड संघाला एकही पेनल्टी कॉर्नर मिळाला नाही. सविता पुनियाचे गोलरक्षण भक्कम झाल्याने इंग्लंडला विजयापासून वंचित व्हावे लागले. या सामन्यात भारताला एकूण सात पेनल्टी कॉर्नर्स मिळाले पण त्याचा भारतीय संघाला लाभ उठविता आला नाही. या स्पर्धेत रविवारी ब गटातील झालेल्या सामन्यात चीनने न्यूझीलंडला 2-2 असे बरोबरीत रोखले होते. मंगळवारी या स्पर्धेत इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात ब गटातील दुसरा सामना खेळविला जाणार आहे.









