वृत्तसंस्था / राजगीर (बिहार)
येथे सुरू असलेल्या पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत शनिवारी हरमनप्रित सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरूष हॉकी संघाचा सुपर-4 फेरीतील शेवटचा सामना चीनबरोबर होणार आहे. या स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यासाठी भारतीय हॉकी संघाला चीन विरुद्धच्या सामन्यात सर्वच विभागात दर्जेदार कामगिरी करावी लागेल.
या स्पर्धेत भारतीय हॉकी संघाला आतापर्यंत पाचवेळा विजेतेपद मिळविणाऱ्या द. कोरियाने 2-2 असे बरोबरीत रोखले आहे. सुपर-4 फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताने मलेशियाचा 4-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. शनिवारच्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने मोठ्या फरकाने चीनवर विजय मिळविल्यास ते सुपर-4 फेरीच्या गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळू शकतील. भारताने या स्पर्धेतन आतापर्यंत दोन सामन्यांतून चार गुण मिळविले आहेत. तर कोरियाला केवळ एका गुणांवर समाधान मानावे लागले आहे.
कोरिया बरोबरचा सामना भारतीय संघाला जिंकता आला नाही. पण सुपर-4 फेरीतील झालेल्या दुसऱ्या एका सामन्यात भारताने मलेशियावर मोठ्या फरकाने विजय मिळविला आहे. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये भारतीय संघाच्या मध्यफळीतील खेळाडूंची कामगिरी निश्चितच दर्जेदार झाली आहे. मनप्रितसिंग, हार्दीक सिंग, विवेकसागर प्रसाद आणि राजिंदर सिंग यांच्या शानदार कामगिरीमुळे भारतीय हॉकी संघाला प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळविणे शक्य झाले आहे. अभिषेक सुखजित सिंग आणि मनदीप सिंग यांच्यावर भारतीय संघाच्या आघाडी फळीची बिस्त राहील. जुगराज सिंग, संजय, अमित रोहीदास यांना मात्र चांगली कामगिरी करण्यासाठी झगडावे लागेल. मलेशियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला 6 पेनल्टी कॉर्नर्स मिळाले होते आणि त्यापैकी केवळ एका कॉर्नरवर भारताने गोल नोंदविला. या सामन्यात भारताला सहा पेनल्टी कॉर्नर मिळाले होते.
आशिया चषक हॉकी स्पर्धेत प्राथमिक फेरीतील सामन्यात चायना संघाला भारताकडून 3-4 असा पराभव पत्करावा लागला होता.पुढील वर्षी महिलांची विश्वचषक हॉकी स्पर्धा होणार असून आशिया चषक स्पर्धेतील विजेता संघ थेट पात्र ठरेल. भारत आणि चीन यांच्यातील या सामन्याला 7.30 वाजता प्रारंभ होईल.









