नवी दिल्ली / वृत्तसंस्था
लडाख सीमेवर मार्च 2020 मध्ये सुरू झालेला भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष अद्याप संपलेला नाही. डेपसांग आणि डेमचोकसारख्या भागात दोन्ही देशांचे सैन्य आजही आमनेसामने आहेत. दरम्यान, भारत आणि चीनने आपले सैन्य मागे घेण्यासही सहमती दर्शवलेली नाही. गेल्या पाच महिन्यांपासून दोन्ही देशांमध्ये लष्करी चर्चाही झालेली नाही. आता भारत आणि चीनचे लष्करी अधिकारी 17 जुलै रोजी कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेच्या 16 व्या फेरीची चर्चा करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या चर्चेत भारताचे प्रतिनिधित्व फायर अँड फ्युरी कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल ए. सेनगुप्ता करणार आहेत. ही बैठक चीनच्या बाजूने असेल की भारताच्या बाजूने असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तथापि, पुन्हा एकदा एलएसीमधील संघर्षाच्या ठिकाणांवरून सैन्य मागे घेण्यावर चर्चा होणार आहे.
भारत आणि चीनदरम्यान यापूर्वी मार्चच्या सुरुवातीला लडाखमधील चुशूल मोल्डो येथे चर्चा झाली होती. भारतीय बाजूचे नेतृत्व लेह-आधारित लष्कराच्या 14 व्या कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट-जनरल अनिंद्य सेनगुप्ता आणि चीनच्या बाजूचे नेतृत्व दक्षिण शिनजियांग मिलिटरी डिस्ट्रिक्टचे प्रमुख मेजर जनरल यांग लिन यांनी केले. सकाळी दहा वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत मॅरेथॉन बैठक झाली होती. या दोघांनीही त्यापूर्वी 12 जानेवारी रोजी झालेल्या फेरीपासून पश्चिम विभागातील एलएसीवरील तातडीच्या समस्या सोडवण्यासाठीची चर्चा पुढे नेली. उभय देशांच्या नेत्यांनी दिलेले मार्गदर्शन लक्षात घेऊन उर्वरित मुद्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यासाठी दोन्ही बाजूंनी या संदर्भात विचार विनिमय केला होता.
आता येत्या रविवारी होणाऱया बैठकीमध्ये कोणत्या मुद्यावर चर्चा करावी याची रणनीती भारताच्या बाजूने निश्चित केली होती. गेल्या आठवडय़ातच चीनच्या काही लढाऊ विमानांनी भारतीय हवाई हद्दीत प्रवेश केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. भारताच्यावतीने हा मुद्दा बैठकीत उपस्थित केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.









