ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भारत-चीन सीमावादावर तोडगा काढण्यासाठी उद्या (14 ऑगस्ट) कॉर्प्स कमांडर स्तरावर चर्चा होणार आहे. दोन्ही देशांमधील कॉर्प्स कमांडर स्तरावरील बैठकीची ही 19 वी फेरी असणार आहे. फायर अँड फ्युरी कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल रशीम बाली या चर्चेसाठी भारताचं नेतृत्व करतील. परराष्ट्र मंत्रालय आणि आयटीबीपीचे अधिकारीही चर्चेत सहभागी होण्याची शक्यता आहे.
चुशुल-मोल्डो भागात ही बैठक होणार आहे. या बैठकीत लडाखच्या पूर्व सीमेवरील कोंडी संपवण्याच्या दृष्टीने चर्चा होईल. यापूर्वी झालेल्या बैठकीत अनेक मुद्यांवर दोन्ही देशांची सहमती झाली आहे. मात्र, काही मुद्यांमुळे तणाव वाढला आहे. उद्या होणाऱ्या 19 व्या बैठकीत भारत पूर्व लडाखमधील सामरिकदृष्टय़ा महत्त्वाच्या देपसांग आणि डेमचोक भागातून सैन्य काढून टाकण्याचा आग्रह धरु शकतो.
India-China to hold 19th round of corps commander talks on August 14. pic.twitter.com/Ke7IWXJZ3O
— ANI (@ANI) August 13, 2023
2020 मध्ये गलवान खोऱ्यात भारतीय सैनिक आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव वाढला आहे. हा तणाव निवळण्यासाठी दोन्ही देशांच्या कॉर्प्स कमांडर स्तरावर चर्चा होत आहेत. आतापर्यंत झालेल्या 18 बैठकांमुळे चीनने अनेक भागात सैन्याची तैनाती कमी केली आहे. लष्करी बफर झोन तयार केले आहेत. उद्याच्या बैठकीत भारत पूर्व लडाख आघाडीतून सैन्य मागे घेण्यासाठी दबाव टाकण्याची शक्यता आहे.









