दोन्ही देशांचे सैनिक जखमी, बैठकीनंतर शांतता, 9 डिसेंबरची घटना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारत आणि चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशात दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झटापट झाल्याचे वृत्त आहे. ही घटना 9 डिसेंबरला घडल्याचे स्पष्ट करण्यात आले. या झटापटीत दोन्ही देशांची अनेक सैनिक जखमी झाले असल्याचीही माहिती आहे. नंतर दोन्ही देशांमध्ये कमांडो पातळीवर बैठक झाली. त्यानंतर समस्या दूर होऊन शांतता प्रस्थापित झाली, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
अरुणाचल प्रदेशात असलेल्या सीमेवरुन दोन्ही देशांमध्ये पूर्वीपासून वाद आहे. अरुणाचल प्रदेशच्या तवांग विभागावर चीनने आपला दावा सांगितला आहे. तथापि, भारताने या दाव्याचा ठाम इन्कार केला असून संपूर्ण अरुणाचल प्रदेश आपलाच असल्याचे स्पष्ट केले आहे. या भागात नेहमी झटापटी होत असतात.
गेल्यावर्षीही अशी परिस्थिती
याच भागात गेल्यावर्षीही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. चीनच्या आगळीकीला भारताच्या सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर झटापट झाली होती. पण भारताच्या सैनिकांनी चीनच्या सैनिकांना मागे ढकलले होते. गेल्यावर्षीही चीनची काहीही मात्रा चालली नव्हती, तशी यावेळीही चाललेली नाही. गेल्या वर्षी 200 चिनी सैनिकांनी भारताच्या भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. तो पूर्णतः भारतीय सैनिकांकडून हाणून पाडण्यात आला होता.
भारताकडून मार्गबांधणी
या भागाकडे भारताच्या पूर्वीच्या सरकारांनी कमालीचे दुर्लक्ष केले होते. सैनिकांच्या हालचालींसाठी किमान पायाभूत सुविधाही तेथे नव्हत्या. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने मात्र येथे गेल्या आठ वर्षांपासून मार्ग बांधणीचे काम हाती घेतले आहे. बऱयाच भागांमध्ये आता रणगाडे जाऊ शकतील आशी मार्गबांधणी झालेली आहे. त्याचप्रमाणे वायुदलाच्या कारवाईसाठीही योग्य त्या पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात आलेली आहे. त्यामुळे यावेळी भारत चीनच्या कोणत्याही आगळीकीचा समाचार अधिक चांगल्याप्रकारे घेण्यास सिद्ध आहे.
मॅकमोहन रेषा
भारत आणि चीन यांच्यातील सीमारेषा मॅकमोहन रेषा म्हणून ओळखली जाते. तीन निश्चित नाही. अनेक स्थाने भारत आणि चीन हे दोन्ही देश आपल्या स्वामित्वातील मानतात. विशेषतः चीन बऱयाचदा या भागात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, भारतानेही आता जोरदार तयारी केल्याने वेळीच चीनला रोखणे शक्य होत आहे. भारताने या भागामध्ये वाढीव सैनिक तुकडय़ा आणल्या आहेत.









