वृत्तसंस्था / बीजिंग
भारत आणि चीनने त्यांच्यातील सीमावादावर सहमतीने तोडगा काढणे आवश्यक आहे. हा तोडगा दोन्ही देशांना मान्य होईल असा असावयास हवा, असे प्रतिपादन चीनचे परराष्ट्र व्यवहार मंत्री वांग यी यांनी केले आहे. शनिवारी त्यांनी भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध आणि सध्या लडाखच्या सीमेवर सुरु असणारा वाद यांच्यासंबंधी चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही देशांनी वादाचे विशिष्ट मुद्दे टाळून द्विपक्षीय संबंध व्यापक केले पाहिजेत, अशीही सूचना त्यांनी केल्याचे स्पष्ट करण्यात आले. या दोन्ही नेत्यांची भेट एसिआनच्या परिषदेच्या निमित्ताने झाली.









