मॉस्को / वृत्तसंस्था
तटस्थ असणाऱया फिनलंड या देशाला नाटोमध्ये सामावून घेण्यास अनुमती दिली गेल्यानंतर आता रशियानेही आपला गट बळकट करण्याच्या दिशेने पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे. भारत आणि चीन हे आपले मुख्य मित्रदेश आहेत, अशी घोषणा त्या देशाने केली आहे. भारत आणि चीन हे दोन्ही देश जागतिक सामर्थ्याची केंद्रे असून त्यांच्याशी संबंध अधिक दृढ केले जातील, असे अधिकृत विधान रशियाने केले आहे. विशेषत्वाने भारताशी दृढ धोरणात्मक संबंध निर्माण करण्यावर भर दिला जाईल. दोन्ही देशांना लाभदायक ठरतील अशा क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यावर रशियाचा भर असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन भारतात होणार असणाऱया एससीओ आणि जी-20 परिषदांच्या बैठकांना उपस्थित राहण्याच्या तयारीत आहेत. भारताशी संबंध त्यांना दृढ करायचे असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे, असे सांगण्यात आले आहे. ही स्थिती भारताला अनुकूल आहे, असे आंतरराष्ट्रीय तज्ञांचे मत आहे. रशिया अनेक क्षेत्रांमध्ये भारताला झुकते माप देऊ शकतो, अशी स्थिती आहे.









