सॅम पित्रोदा यांचे पुन्हा वादग्रस्त विधान, भाजपची तीव्र प्रतिक्रिया, काँग्रेसनेही झटकले हात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय विदेशी काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदा यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केल्याने राजकारण तापले आहे. भारत आणि चीन यांच्यात मध्यंतरीच्या काळात जो संघर्ष झाला, त्याला विनाकारण नको इतके महत्व देण्यात आले. भारताने चीनला आपला शत्रू न समजता त्याच्याशी सहकार्य केले पाहिजे. भारताच्या आक्रमक भूमीकेमुळे शत्रू निर्माण होत आहेत, असे प्रतिपादन त्यांनी सोमवारी केल्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला असून भारताने पित्रोदा यांच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत जोरदार टीका केली आहे.
एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना पित्रोदा यांनी त्यांची मते व्यक्त केली आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार भारत आणि चीन यांनी गुण्यागोविंदाने राहणे आवश्यक आहे. भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद फारसा महत्वाचा नाही. तो महत्वाचा असल्याचे भासविले जात आहे. चीनला शत्रू मानण्याचे भारताला काहीही कारण नाही. भारत आणि चीन यांच्यातील संघर्षाचे महत्व अमेरिकेमुळे अवास्तव वाढले आहे. अमेरिकेला काल्पनिक शत्रू निर्माण करण्याची सवय आहे. भारताने या जाळ्यात अडकू नये. चीनशी मैत्री करावी, असा अनहूत सल्ला त्यांनी दिला.
विधानाची पार्श्वभूमी
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचे दौऱ्यावर असताना त्यांची अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी भेट झाली होती. या भेटीत आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही चर्चा झाली होती. भारत आणि चीन यांच्यात झालेल्या संघर्षावर ट्रंप यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. हा संघर्ष मिटविण्यासाठी अमेरिका साहाय्य करु शकेल, असे विधान त्यांनी केले होते. या पार्श्वभूमीवर पित्रोदा यांनी हे विधान केले होते.
भारताच्या भूमिकेवर टीका
सॅम पित्रोदा यांनी आपल्या या मुलाखतीत भारतावरही टीका केली. भारताची चीनकडे बघण्याची दृष्टी नकारात्मक राहिली आहे. भारताने आक्रमक भूमिका घेतल्याने त्याला शत्रू निर्माण होत आहेत. चीनला भारताने समजून घेतल्यास विदुष्ट दूर होऊ शकते. सध्या संघर्ष नव्हे, तर सहकार्याची आवश्यकता आहे, अशी अनेक विमाने पित्रोदा यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केली.
काँग्रेसने झटकले हात
पित्रोदा यांच्या नव्या विधानामुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे. चीनच्या आक्रमकतेसंबंधी काँग्रेस केंद्र सरकारला प्रश्न विचारत असताना, पित्रोदा यांनी चीनशी मैत्री करा, असे आवाहन केल्याने काँग्रेसचे नेमके धोरण काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पित्रोदा यांच्या विधानांशी आपल्या पक्षाचा काहीही संबंध नाही. ते त्यांचे व्यक्तीगत मत आहे, अशी सारवासारवी करत काँग्रेसने हात झटकले. तथापि, पित्रोदा आणि काँग्रेस यांचे संबंध पाहता त्यांच्या विधानांमुळे काँग्रेसवर होणारी टीका तो पक्ष टाळू शकणार नाही, असेही मत व्यक्त होत आहे.
काँग्रेसचे अंतरंग उघड
सॅम पित्रोदा यांचे विधान काँग्रेसचे अंतरंग उघडे करणारे आहे. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी चीनचे गुणगान करत केंद्र सरकारवर टीका केली होती. त्यामुळे आज पित्रोदा यांच्या विधानावर काँग्रेसने हात झटकले असले, तरी आतून या पक्षाचे चीनशी असलेले मधुर संबंध या विधानांच्यामुळे उघड होतात. काँग्रेस आणि चीनचा सत्ताधारी कम्युनिस्ट पक्ष यांच्यात गुप्त करार झाला आहे. तो कोणत्या स्वरुपाचा असेल, हे पित्रोदा यांच्या विधानांवरुन दर्शविले जात आहे. कोणाशीही मैत्री करताना भारत आपला स्वाभिमान आणि आपले सार्वभौमत्व गुंडाळून ठेवणार नाही. स्वत्वाशी तडजोड करणार नाही, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाने व्यक्त केली आहे.









