दोन्ही देशांदरम्यान सहमती : चिलीचे अध्यक्ष 5 दिवसांच्या दौऱ्यावर : संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि चिलीने व्यापक व्यापार करारावर चर्चा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. चिलीचे अध्यक्ष गॅब्रियल बोरिक फॉन्ट हे भारत दौऱ्यावर आले आहेत. चिलीचे अध्यक्ष फॉन्ट यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे. या भेटीत द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या दृष्टीकोनातून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. बोरिक हे पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. स्वत:च्या या दौऱ्यात ते भारतासोबत द्विपक्षीय सहकार्य वाढविण्याच्या शक्यता पडताळून पाहणार असून यात व्यापार आणि संरक्षण क्षेत्र देखील सामील आहे.
दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांनी व्यापक आर्थिक भागीदारीच्या दिशेने चर्चेची सुरुवात केली आहे. दोन्ही देशांदरम्यान महत्त्वपूर्ण खनिजांच्या क्षेत्रात भागीदारीची शक्यता पडताळून पाहिली जाणार आहे. चिली हा देश दक्षिण अमेरिकेत भारताचा महत्त्वपूर्ण भागीदार आहे. भारत चिली या देशाला अंटार्क्टिकाचे प्रवेशद्वार मानतो. भारत डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, नुतनीकरणीय ऊर्जा, रेल्वे, अंतराळ आणि अन्य क्षेत्रांमध्ये स्वत:चा सकारात्मक अनुभव चिलीसमोर मांडण्यास तयार असल्याचे उद्गार पंतप्रधान मोदींनी काढले आहेत.
चिलीमध्ये योग दिनाची घोषणा
अध्यक्ष बोरिक यांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. भारतासोबत संबंध मजबूत करण्यासाठीचे त्यांचे समर्पण अद्भूत आहे. आजच्या (मंगळवार) चर्चेत आम्ही अन्नसुरक्षा प्रकरणात परस्परांच्या क्षमता मजबूत करण्यावरही विचारांचे आदानप्रदान केले. चिलीमध्ये आरोग्य सुरक्षेच्या क्षेत्रात भारत विश्वसनीय भागीदार आहे. चिलीमध्ये योग दिन अवलंबिला जात असून ही अत्यंत आनंदाची बाब आहे. चिलीमध्ये 4 नोव्हेंबर रोजी योग दिन घोषित करण्यात आला आहे. आम्ही चिलीमध्ये आयुर्वेद आणि पारंपरिक चिकित्सेला चालना देण्याच्या मुद्द्यावरही चर्चा केली. संरक्षण क्षेत्रात वाढते सहकार्य दोन्ही देशांदरम्यान वाढत्या परस्पर विश्वासाचे प्रतीक असल्याचे मोदींनी म्हटले आहे.
संघटित गुन्हेगारी, अमली पदार्थांची तस्करी, दहशतवाद विरोधी लढ्यात आम्ही सहकार्य वाढविणार आहोत. जागतिक आघाडीवर संघर्षांना चर्चेद्वारे निकालात काढण्यात यावे असे दोन्ही देशांचे मानणे आहे. भारत आणि चिली हे भौगोलिकदृष्ट्या दूर असले तरीही दोन्ही देश भावनात्मक दृष्ट्या जोडलेले आहेत. चिलीत भारतीय चित्रपटांची वाढती लोकप्रियता आमच्या सांस्कृतिक संबंधांचे उदाहरण आहे. भारत आणि चिलीदरम्यान विद्यार्थ्यांच्या एक्सचेंजलही वाढविण्यात येणार असल्याचे मोदींनी नमूद केले.
भारताच्या स्थायी सदस्यत्वाला समर्थन
दोन्ही देशांदरम्यान सहकार्याच्या अनेक शक्यता आहेत. आम्ही भारताच्या ऑडिओ व्हिज्युअल उद्योगाला चिलीत नेऊ इच्छितो. याकरता आम्ही शूट इन चिली कार्यक्रमाची सुरुवात केली आहे. बॉलिवूडच्या माध्यमातून भारताने जे साध्य केले आहे, ते कौतुकास्पद आहे. आम्ही भारताच्या संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्यत्वाचे समर्थन करतो. तसेच सुरक्षा परिषदेत सुधारणांचे समर्थन करतो असे उद्गार चिलीचे अध्यक्ष बोरिक यांनी काढले आहेत.









