अमेरिकेला जशास तसे उत्तर देण्यासाठी आहे सज्ज
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
अमेरिकेने भारतावर 50 टक्के व्यापार शुल्क लागू पेले असून त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने अमेरिकेशी होणार असलेल्या 31 हजार 500 कोटी रुपयांचा पी-81 विमानांचा व्यवहार रोखण्याचा निर्णय घेतला आहे, असे अनधिकृत वृत्त आहे. हा व्यवहार ‘पोसायडन डील’ म्हणून ओळखला जातो. या व्यवहाराअंतर्गत भारत अमेरिकेकडून आणखी सहा पी-82 विमाने विकत घेणार होता. तथापि, भारताने या व्यवहारावर पुढची कृती न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.
ही पी-81 विमाने भारताच्या नौदलासाठी उपयुक्त मानण्यात येतात. सध्या अशी 12 विमाने नौदलात कार्यरत आहेत. ही विमाने अमेरिकेच्या बोईंग कंपनीने उत्पादित केली आहेत. 2009 मध्ये भारताने ती खरेदी करण्याचा करार केला. भारत या विमानांचा जगातील प्रथम ग्राहक होता. अशी 12 विमाने आतापर्यंत भारताला मिळालेली आहेत. आणखी सहा विमाने दिली जाणार होती. मात्र, याच काळात भारताचा अमेरिकेशी व्यापारी तणाव निर्माण झाल्याने भारताने ही खरेदी पुढे ढकलली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली असून कदाचित हा करार रद्दही गेला जाऊ शकतो, अशी परिस्थिती असल्याचीही चर्चा केली जात आहे.
2021 मध्ये मान्यता
भारताला पी-81 प्रकारची आणखी सहा विमाने विकण्यास अमेरिकेच्या प्रशासनाने 2021 मध्ये मान्यता दिली होती. ही विमाने अतिशय उपयुक्त आणि प्रभावी असल्याने भारताला हा करार पूर्ण करायचा होता. यावर्षाच्या अखेरीपर्यंत हा व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता होती. तथापि, आता या व्यवहारासंबंधीच्या हालचाली थंडावल्याचे वृत्त आहे. ही विमाने अत्याधुनिक मानली जातात.
अत्याधुनिक विमाने
पी-81 ही विमाने या प्रकारातील जगातील सर्वात आधुनिक आणि प्रभावी असल्याचे मानण्यात येते. ही विमाने अत्याधुनिक शस्त्रसंभाराने युक्त आहेत. त्यात एनएएसएम-एमआर युद्धनौका विरोधी क्षेपणास्त्रे असून त्यांचा पल्ला 350 किलोमीटरचा आहे. या विमानांचा उपयोग चीनी युद्धनौकांवर लक्ष ठेवण्यासाठी केला जात आहे. हिंदी महासागरात चीनचा वावर अलिकडच्या काळात वाढला असून भारताला चीनच्या नौदलावर लक्ष ठेवावे लागत आहे. भारताच्या नौदलाला आणखी अशी विमाने हवी आहेत. तथापि, सध्या व्यापार शुल्क तणावामुळे संरक्षण साधनसामग्री व्यवहारही थंडावतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहेत.









