वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात झालेले महत्वाचे करार आणि निर्धारित करण्यात आलेल्या भविष्यकालीन योजना यांच्यामुळे भारताचा लाभ होणार आहे. तसेच दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होणार आहेत, अशी प्रतिक्रिया सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून व्यक्त करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते हरदीपसिंग पुरी यांनी एका पत्रकार परिषदेत या दौऱ्याची माहिती देताना दौऱ्यात झालेल्या करारांचे विश्लेषण केले.
भारत आणि अमेरिका यांच्यात अनेक करार करण्यात आले. इतके करार एका दौऱ्यात होण्याची ही प्रथमच वेळ आहे. सर्व करार तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि आर्थिक तसेच सामरिक संबंधातील असून त्यामुळे भारताच्या सैन्यदलांची शक्ती वाढण्यास सहाय्य होईल. विशेषत: भारताच्या युद्धविमानांसाठी इंजिन भारताच निर्माण करण्याचा करार, या इंजिनाचे तंत्रज्ञान कालांतराने भारताला मिळण्याची शक्यता आणि भारतासाठी अत्यावश्यक असणाऱ्या प्रेडेटर ड्रोनचा करार हे भारताच्या दृष्टीने विशेष लाभदायक आहेत. ड्रोन मिळाल्यानंतर चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेवरील हालचालींवर एकाच वेळी लक्ष ठेवणे आणि वेळप्रसंगी कारवाई करणे भारताला शक्य होणार आहे, अशी प्रतिक्रिया तज्ञांनी व्यक्त केली.
मुत्सद्दी संबंधस्थापना
या दौऱ्यात भारताने महत्वपूर्ण लक्ष्ये साध्य केली आहेत. धोरणात्मक संबंधस्थापना (स्ट्रेटेजिक आऊटरीच) करण्यात भारत यशस्वी ठरला. हा दौरा केवळ उत्सवी नव्हता. तर अत्यंत भरीव असा आशय साध्य करण्यात आला आहे. विशेषत: तंत्रज्ञान हस्तांतरण हे भविष्यात भारताची संरक्षण व्यवस्था भक्कम करण्यासाठी साहाय्यभूत ठरणार आहे, अशी टिप्पणी पुरी यांनी केली.









