यजमान नॉर्वेविरुद्ध सलामीच्या दोन्ही लढतीत भारतीय टेनिसपटू पराभूत,
लिलिहॅमर (नॉर्वे)
डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेच्या विश्व गट-1 मधील लढतीत पहिल्याच दिवशी यजमान नॉर्वेने भारतावर 2-0 अशी आघाडी मिळविली. या लढतीतील सलामीचे दोन सामने भारताने गमविले आहेत.
शुक्रवारी या लढतीमध्ये झालेल्या पहिल्या एकेरी सामन्यात नॉर्वेच्या द्वितीय मानांकित कास्पर रुडने भारताच्या प्रजनिश गुणेश्वरनचा 6-1, 6-4 अशा सरळ सेटस्मध्ये पराभव करत आपला संघाच्या विजयाचे खाते उघडले. या लढतीत अपेक्षेप्रमाणे निकाल पहावयास मिळाला. एटीपीच्या क्रमवारीत द्वितीय स्थानावर झेप घेतलेल्या कास्पर रुडसमोर गुणेश्वरनचा खेळ अत्यंत किरकोळ ठरला. पहिल्या सेटमध्ये गुणेश्वरनला केवळ एक गेम जिंकता आला. त्यानंतर दुसऱया गेममध्ये गुणेश्वरनने रुडला बऱयापैकी प्रतिकार करताना चार गेम्स जिंकले. रुडने गुणेश्वरनचे आव्हान 62 मिनिटात संपुषात आणले.
दुसऱया एकेरी सामन्यात नॉर्वेच्या व्हिक्टर डय़ुरासोविकने भारताच्या रामकुमार रामनाथनवर 6-1, 6-4 अशा सरळ सेटस्मध्ये मात करून आपल्या संघाची आघाडी 2-0 अशी वाढवली. हा दुसरा एकेरी सामना 76 मिनिटे चालला होता. डय़ुरासोविकने या सामन्यात आपली वेगवान सर्व्हिस अधिक वेळ राखत रामनाथनला वारंवार चुका करण्यास भाग पाडले. या लढतीत डय़ुरासोविकने दुसऱया सेटमध्ये सात बिनतोड सर्विसची नोंद केली. पहिल्या सेटमध्ये डय़ुरासोविकने रामनाथनची दोनवेळा सर्व्हिस तोडली. पहिल्या सेटममध्ये डय़ुरासोविकने पाच बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. आता या लढतीमध्ये शनिवारी पुरुष दुहेरीचा सामना खेळविला जाणार असून युकी भांब्री आणि साकेत मिनेनी यांना संधी दिली जाणार आहे. या लढतीतील परतीचे एकेरी सामने अनुक्रमे गुणेश्वरन-डय़ुरासोविक, रामकुमार रामनाथन-कास्पर रुड यांच्यात होणार आहेत. पुढील वर्षी होणाऱया डेव्हिस चषक स्पर्धेच्या पात्र फेरीमध्ये प्रवेश करण्याकरिता भारताला ही लढत जिंकणे जरुरीचे आहे. ही लढत गमविली तर भारताची या स्पर्धेत विश्वगट-1 प्ले ऑफ विभागात घसरण होईल.









