मदतीसाठी रवाना केल्या अनेक युद्धनौका : हजारो टन मदतसामग्री प्रदान : बचावकार्यात भारतीय पथकाचा सहभाग
वृत्तसंस्था/ मांडले
म्यानमारमध्ये भूकंपानंतर सर्वप्रथम भारतानेच मदतीसाठी हात पुढे केला होता. भारताने मंगळवारी देखील 400 टन मदतसामग्री एका युद्धनौकेद्वारे म्यानमारमध्ये पाठविली आहे. याचबरोबर भारताने मदत-बचाव अन् शोधमोहिमेसाठी टीम देखील पाठविली आहे. भारत सरकार ‘ऑपरेशन ब्रह्मा’द्वारे म्यानमारमध्ये भूकंपग्रस्तांना मदत करत आहे. म्यानमारमध्ये शुक्रवारी 7.7 तीव्रतेचा भूकंप झाला होता, यात सुमारे 2 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे.
भारत मांडले विमानतळावर एक रुग्णालय देखील संचालित करत असून तेथे जखमींवर उपचार केले जात आहेत. तर 80 सदस्यीय एनडीआरएफचे पथक कोसळलेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यांखालून लोकांना बाहेर काढण्याचे काम करत आहे. तर मंगळवारी विशाखापट्टणम बंदरावरून आयएनएस घडियालला 442 मेट्रिक टन मदतसामग्रीसह रवाना करण्यात आले आहे. तर एसी-130 वाहतूक विमानाद्वारे देखील 16 टन मदतसामग्री म्यानमारमध्ये पाठविण्यात आली आहे.
याचबरोबर 30 टन मदतसामग्री यापूर्वी म्यानमारमध्ये पोहोचविण्यात आली आहे. यात अन्नधान्य, तंबू आणि औषधे सामील होती. आयएनएस सातपुडा आणि आयएनएस सावित्री 50 टने सामग्रीसह म्यानमारमध्ये पोहोचली आहे. म्यानमारमध्ये तीव्र भूकंपानंतर आणखी अनेक धक्के जाणवले आहेत. अशा स्थितीत लोक दहशतीत असून ते घरांमध्ये परतण्यास तयार नाहीत. मोठ्या संख्येत लोक मोकळ्या जागेत किंवा तंबूत राहत आहेत.
शेजारी प्रथम धोरणाच्या अंतर्गत भारताते त्वरित मदत अन् बचावकार्यासाठी पुढाकार घेतला. सर्वप्रथम मदतीचा हात भारतच पुढे करतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. भारताने शनिवारी भूकंप पीडितांच्या मदतीसाठी पाच सैन्य विमानांमधून मदतसामग्री, बचावपथक, वैद्यकीय उपकरणे म्यानमारमध्ये पाठविली होती. भारतासह चीन, रशिया, फिलिपाईन्स, पाकिस्तान आणि अन्य देश देखील म्यानमारमध्ये मदतसामग्री पाठवत आहेत. परंतु हे पाऊल सर्वप्रथम भारतानेच उचलले होते.









