मालिका 2-1 फरकाने भारताकडे : अर्धशतकांची हॅट्ट्रिक साजरी करणारा इशान किशन मालिकावीर, शुभमन गिल सामनावीर
वृत्तसंस्था/ तौराबा (वेस्ट इंडिज)
भारताने तिसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजवर 200 धावांनी दणदणीत विजय साकारला. या विजयासह भारताने वनडे मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करताना 351 धावांचा डोंगर उभारला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा डाव पत्त्याच्या डावासारखा गडगडला आणि त्यांचे 17 वर्षांपासूनचे मालिका विजयाचे स्वप्न अधुरेच राहिले. मालिकेत तीन अर्धशतके झळकावणाऱ्या इशान किशनला मालिकावीर तर शुभमन गिलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
भारताने विजयासाठी दिलेल्या 352 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजची सुरुवात अतिशय खराब झाली. भारताच्या भेदक माऱ्यापुढे विंडीजची आघाडीची फळी ढेपाळली. विंडीजचे आठ फलंदाज अवघ्या 88 धावांत तंबूत परतले होते. तळाच्या फलंदाजांनी जिगरबाज खेळी केल्यामुळे विंडीजला 151 धावापर्यंत मजल मारता आली. आघाडीच्या फलंदाजात फक्त अॅथनेज्झ्ने भारतीय गोलंदाजांचा प्रतिकार केला. त्याचा अपवाद वगळता एकालाही मोठी खेळी करता आली नाही. अॅथनेझने 99 चेंडूत 3 चौकारासह 32 धावांची खेळी केली. तळाच्या फलंदाजांनी मात्र लाज राखली. गुडाकेश मोतीने सर्वाधिक 34 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारासह नाबाद 39 धावांची खेळी साकारली. याशिवाय अल्जारी जोसेफ याने दोन षटकाराच्या मदतीने 26 धावांचे योगदान दिले. यानिक कॅरियाने 19 धावा फटकावल्या. इतर फलंदाजांनी सपशेल निराशा केल्याने विंडीजचा डाव 35.3 षटकांत 151 धावांवर आटोपला व टीम इंडियाने हा सामना 200 धावांनी जिंकत ही मालिका खिशात घातली. विशेष म्हणजे, भारताच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच विंडीजच्या फलंदाजांवर अंकुश ठेवला. भारताकडून शार्दुल ठाकुरने 4 तर मुकेश कुमारने तीन, कुलदीप यादवने दोन बळी घेत विजयात मोलाची भूमिका बजावली.
भारताचा 351 धावांचा डोंगर
भारतीय संघ प्रथम फलंदाजीला आल्यानंतर सलामीवीर इशान किशन आणि शुभमन गिल यांच्यात पहिल्या विकेटसाठी 143 धावांची भागीदारी झाली. इशान किशनने 64 चेंडूत 77 धावांची भागीदारी केली, तर शुभमन गिलने 92 चेंडूत 85 धावा कुटल्या. इशानने सलग तिसऱ्या सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी साकारली. इशान बाद झाल्यानंतर आलेला ऋतुराज गायकवाड फारशी चमक दाखवू शकला नाही. त्याने 8 धावा केल्या. मागील सामन्यात अपयशी ठरलेल्या संजू सॅमसनने आक्रमक खेळताना 41 चेंडूत 51 धावा केल्या. अर्धशतकानंतर सॅमसन लगेच बाद झाला. तर 85 धावांवर गिलला मोटीने बाद केले. यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने 52 चेंडूत 4 चौकार व 5 षटकारासह 70 तर सुर्यकुमार यादवने 30 चेंडूत 35 धावा करत संघाला साडेतीनशेचा टप्पा गाठून दिला. जडेजा 8 धावांवर नाबाद राहिला. यामुळे भारतीय संघाने निर्धारित 50 षटकांत 5 बाद 351 धावांचा डोंगर उभा केला.
संक्षिप्त धावफलक : भारत 50 षटकांत 5 बाद 351 (गिल 85, इशान किशन 77, सॅमसन 51, हार्दिक पंड्या 77, सुर्यकुमार 35, शेफर्ड दोन बळी तर जोसेफ, कॅरिया, मोती प्रत्येकी एक बळी)
वेस्ट इंडिज 35.3 षटकांत सर्वबाद 151 (अॅथनेझ 32, मोती नाबाद 39, जोसेफ 26, शार्दुल ठाकुर 37 धावांत 4 बळी, मुकेश कुमार 30 धावांत 3 बळी, कुलदीप यादव 25 धावांत 2 बळी).
विंडीजविरुद्ध टीम इंडियाचे वर्ल्ड रेकॉर्ड
- तिसऱ्या वनडेत टीम इंडियाने विंडीजविरुद्ध 200 धावांनी दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे, कोणत्याही संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध वेस्ट इंडिजमध्ये मिळेवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. 2007 मध्ये एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर 186 धावांनी विजय मिळवणाऱ्या इंग्लंडचा विश्वविक्रम भारताने मोडला. याचवेळी 2008 मध्ये घरच्या मैदानावर विंडीजविरुद्ध ऑस्ट्रेलियाविरुद्ध 169 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. अशाप्रकारे टीम इंडियाने आता वेस्ट इंडिजमध्ये नवा विश्वविक्रम रचला आहे. विंडीजविरुद्ध भारताचा धावांच्या बाबतीत हा दुसरा सर्वात मोठा विजय ठरला. 2018 मध्ये भारताने मुंबईत वेस्ट इंडिजचा 224 धावांनी पराभव केला होता.
- वनडेमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक सलग द्विपक्षीय मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम यापूर्वी पाकिस्तानने नोंदवला होता. मात्र भारतीय संघाने आता पाकिस्तानला मागे टाकत विंडीजविरुद्ध सलग 13 वनडे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे. पाकिस्तान आता दुसऱ्या स्थानी असून पाकने झिम्बाब्वेविरुद्ध सलग 11 तर विंडीजविरुद्ध सलग 10 मालिका जिंकल्या आहेत आणि भारताने श्रीलंकेला सलग 10 एकदिवसीय मालिकेत पराभूत केले आहे.









