रोहिदास, हार्दिकने नोंदवले गोल, अर्जेन्टिनाचा निसटता विजय तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंडचे मोठे यश
वृत्तसंस्था/ भुवनेश्वर
माजी ऑलिम्पिक चॅम्पियन्स अर्जेन्टिनाने एफआयएच विश्वचषक हॉकी स्पर्धेतील उद्घाटनाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर एकमेव गोलने विजय मिळविला. मात्र या विजयासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. अन्य सामन्यात इंग्लंडने वेल्सचा 5-0 तर ऑस्ट्रेलियाने फ्रान्सचा 8-0 असा धुव्वा उडविला आणि दिवसातील शेवटच्या सामन्यात यजमान भारताने स्पेनचा 2-0 असा पराभव करून विजयी सलामी दिली.
गट ड मधील सामन्यात भारताचे गोल अमित रोहिदास व हार्दिक यांनी नोंदवले. पहिल्या सत्रातील 13 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर भारताला आघाडीवर नेले. त्यानंतर 26 व्या मिनिटाला हार्दिकने ही आघाडी वाढविली. हार्दिकने डाव्या बगलेतून चेंडूसह आगेकूच करीत गोलमुखापर्यंत मुसंडी मारली आणि किंचित उंच फटका मारल्यानंतर चेंडू स्पेनच्या खेळाडूच्या पायाला लागून गोलपोस्टमध्ये गेला. भारताचा पुढील सामना इंग्लंडविरुदद्ध 15 जानेवारी रोजी होईल तर स्पेनचा मुकाबला त्याच दिवशी वेल्सविरुद्ध होईल.
अर्जेन्टिनाचा संघर्ष
गट अ मधील या सामन्यात 14 व्या मानांकित दक्षिण आफ्रिकेने अर्जेन्टिनाला संघर्ष करण्यास भाग पाडले. पहिल्या दोन सत्रात दोन्ही संघांनी जोरदार खेळ केला, पण दोन्ही संघांना गोल नोंदवता आला नाही. मात्र तिसऱया सत्रात 42 व्या मिनिटाला कॅसेला मायकोने एकमेव गोल नोंदवला. हाच गोल शेवटी निर्णायक ठरला. अर्जेन्टिनाने 2016 मध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळविले होते. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या सत्रात अर्जेन्टिनाहून सरस प्रदर्शन करीत त्यांना झगडण्यास भाग पाडले. मात्र त्यांना मिळालेल्या संधींचा लाभ उठविता आला नाही. दुसऱया सत्रात मात्र अर्जेन्टिनाने मुसंडी मारली आणि त्यांनी सलग तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण दक्षिण आफ्रिकेच्या भक्कम बचावामुळे त्यावर त्यांना गोल नोंदवण्यात यश आले नाही.
मध्यंतरानंतर दक्षिण आफ्रिकेने गोलच्या दिशेने पेनल्टी कॉर्नरच्या रूपात पहिला प्रयत्न केला. पण ही संधी त्यांनी वाया घालवली. 42 व्या मिनिटाला मात्र ही कोंडी फोडताना पहिला व एकमेव गोल नोंदवला. कॅसेलाने प्रतिआक्रमणात तोस्कानीच्या पासवर अप्रतिम मैदानी गोल नोंदवला. पिछाडीवर पडल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने चौथ्या सत्रात आक्रमण तेज केले. पण अर्जेन्टिनाने भक्कम बचाव करीत त्यांना गोलपासून वंचित ठेवत पहिला विजय साकार केला. अज्sा&???िनाची दुसरी लढत अग्रमानांकित ऑस्ट्रेलियाविरुद्ध 16 जानेवारी रोजी होईल तर दक्षिण आफ्रिकेचा मुकाबला फ्रान्सविरुद्ध त्याच दिवशी होणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या हेवर्ड, क्रेग यांची हॅट्ट्रिक
गट अ मधील एका सामन्यात बलाढय़ ऑस्ट्रेलियाने फ्रान्सचा 8-0 असा धुव्वा उडवित मोठा विजय नोंदवला तर गट ड मधील सामन्यात इंग्लंडने वेल्सचा 5-0 असा फडशा पाडला. वेल्स या स्पर्धेसाठी पहिल्यांदाच पात्र ठरले आहे. विशेष म्हणजे एकेकाळचे पॉवरहाऊस मानल्या जाणाऱया पाकिस्तानला या स्पर्धेसाठी पात्रता मिळविता आली नाही. ऑस्ट्रेलियाच्या जेरेमी हेवर्ड व टॉम क्रेग यांनी फ्रान्सविरुद्धच्या लढतीत हॅट्ट्रिक नोंदवली. क्रेगने 8, 31, 44 व्या मिनिटाला मैदानी गोल नोंदवले तर हेवर्डने बारा मिनिटांतील तीन पेनल्टी कॉर्नर्सवर तीन गोल नोंदवले. त्याने 26, 28 व 38 व्या मिनिटाला हे गोल नोंदवले.
आजचे निकाल
1) अर्जेन्टिना विवि दक्षिण आफ्रिका 1-0
2) इंग्लंड विवि वेल्स 5-0
3) ऑस्ट्रेलिया विवि फ्रान्स 8-0
4) भारत विवि स्पेन 2-0
आजचे सामने
1) न्यूझीलंड वि. चिली
वेळ ः दु. 1 वा., स्थळ ः राऊरकेल्क्क
2) नेदरलँड्स वि. मलेशिया
वेळ ः दु. 3 वा., स्थळ ः राऊरकेला
3) बेल्जियम वि. कोरिया
वेळ ः सायं. 5 वा., स्थळ ः भुवनेश्वर
4) जपान वि. जर्मनी
वेळ ः सायं. 7 वा., स्थळ ः भुवनेश्वर
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स फर्स्ट,
सिलेक्ट 2 एचडी, सिलेक्ट 2 एसडी.









