वृत्तसंस्था/ पणजी (गोवा)
पणजी जिमखाना स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर सुरू असलेल्या अंधांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने लंकेचा 7 गडय़ांनी पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश मिळविला आहे. सदर स्पर्धेमध्ये भारतीय संघाने राऊंड रॉबिन फेरीतील सामने जिंकून गटात आघाडीचे स्थान मिळविले आहे.
या स्पर्धेत भारताचा उपांत्य फेरीचा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर होणार आहे तर या स्पर्धेतील दुसरी उपांत्य लढत लंका आणि बांगलादेश यांच्यात खेळविली जाईल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना लंका संघाने 20 षटकात 8 बाद 137 धावा जमविल्या. त्यानंतर भारताने 11.5 षटकात 3 बाद 139 धावा जमवित विजय नोंदविला.
लंकेच्या डावामध्ये रुवान वसंताने 40 तर दमित सेदुवानने 18 धावा केल्या. भारतातर्फे अजयकुमार रेड्डी आणि सुनील रमेश यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्यानंतर भारताच्या डावात प्रकाश जयरामय्याने 81 धावा फटकाविल्या. प्रकाश जयरामय्या आणि ललित मीना या जोडीने दुसऱया गडय़ासाठी 71 धावांची भागीदारी केली. भारताची धावसंख्या 112 असताना प्रकाश जयरामय्या निवृत्त झाला. भारताच्या डावातील हे 10 वे षटक सुरू होते. भारताला यावेळी 26 धावांची जरुरी होती. जयरामय्याने 44 चेंडूत 17 चौकारांसह 81 धावा झळकविल्या. त्यानंतर अजयकुमार रेड्डी आणि सुनील रमेश यांनी विजयाचे सोपस्कार 11.5 षटकात पूर्ण केले.
संक्षिप्त धावफलक
लंका 20 षटकात 8 बाद 137 (रुवान वसंता 40, सेद्रुवान 18, अजयकुमार रेड्डी 2-18, सुनील रमेश 2-15), भारत 11.5 षटकात 3 बाद 139 (प्रकाश जयरामय्या 81, अजयकुमार रेड्डी नाबाद 20).









