भारताचा 41 धावांनी विजय, रोहितचे अर्धशतक, कुलदीपचे 4 बळी, सामनावीर वेलालगेची अष्टपैलू चमक वाया
वृत्तसंस्था/ कोलंबो
कर्णधार रोहित शर्माची अर्धशतकी खेळी आणि इशान किशन व केएल राहुल यांचे उपयुक्त योगदान आणि कुलदीप यादवसह अन्य गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या आधारे भारताने आशिया चषक सुपर फोर फेरीतील दुसऱ्या सामन्यात लंकेवर 41 धावांनी विजय मिळवित अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. लंकेच्या वेलालगेने केलेली अष्टपैलू कामगिरी मात्र वाया गेली तरी तोच सामनावीराचा मानकरी ठरला. त्याने नाबाद 42 धावा, 40 धावांत 5 बळी व दोन झेल टिपले.
दुनिथ वेलालगे व चरिथ असालंका यांच्या भेदक फिरकीसमोर प्रथम फलंदाजी निवडणाऱ्या भारताचा डाव 49.1 षटकांत 213 धावांत आटोपला. वेलालगेने 5 तर असालंकाने 4 बळी मिळविले. त्यानंतर या माफक आव्हानाचा पाठलाग करताना लंकेचीही दमछाक झाली.

सिराज, बुमराह, कुलदीप यांच्या भेदक माऱ्यासमोर त्यांना धावा जमविणे जड जात होते. 25.1 षटकांत त्यांचे 6 गडी 99 धावांत तंबूत परतले होते. धनंजय डिसिल्वा व वेलालगे यांनी मात्र भारतीय माऱ्याचा समर्थपणे मुकाबला करीत सातव्या गड्यासाठी 63 धावांची भागीदारी करून लंकेच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या तर भारताची चिंता वाढवली होती. पण जडेजाने डिसिल्वाला बाद करीत ही जोडी फोडली. त्याने 66 चेंडूत 41 धावा केल्या. हार्दिकने थीक्षनाला बाद केल्यानंतर कुलदीपने रजिथा व पथिराना यांना बाद करीत भारताचा विजय साकार केला. वेलालगे 42 धावांवर नाबाद राहिला. त्याने 46 चेंडूत 3 चौकार, 1 षटकार मारला. लंकेचा डाव 42 व्या षटकात 172 धावांवर आटोपला. याशिवाय कुसल मेंडिसने 15, समरविक्रमाने 17, असालंकाने 22, शनाकाने 9 धावा जमविल्या. बदली खेळाडू सूर्यकुमार यादवने दोन अप्रतिम झेल टिपले. जडेजा व बुमराह यांनी प्रत्येकी 2, सिराज हार्दिक यांनी एकेक तर कुलदीपने 43 धावांत 4 बळी मिळविले.
रोहितचे सलग दुसरे अर्धशतक

20 वर्षीय डावखुरा स्पिनर वेलालगेने 40 धावांत 5 तर ऑफस्पिनर असालंकाने 18 धावांत 4 बळी मिळवित आदल्या दिवशी साडेतीनशेहून अधिक धावांची मजल मारणाऱ्या भारताला लंकेने 213 धावांत रोखले. या दोघांचा फिरकी मारा सुरू होण्याआधी प्रथम फलंदाजी घेणाऱ्या भारताला शानदार सुरुवात करून देताना रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी 11.1 षटकांत 80 धावांची सलामी दिली होती. रोहितने आक्रमक फटकेबाजी करीत सलग दुसरे अर्धशतक नोंदवताना 48 चेंडूत 7 चौकार, 2 षटकारांच्या मदतीने 53 धावा फटकावल्या. गिलने मात्र 25 चेंडूत 19 धावा जमविल्या. भारतीय डावातील ही सर्वोच्च भागीदारी ठरली. त्यांचा खेळ पाहून भारत पुन्हा एकदा मोठी मजल मारणार असे वाटत असताना वेलालगे गोलंदाजीस आल्यानंतर चित्र पालटले.
वेलालगेने प्रथम गिलचा त्रिफळा उडविल्यानंतर एका सरळ चेंडूवर रोहितलाही त्रिफळाचीत केले. नंतर त्याने विराट कोहलीलाही 3 धावांवर बाद केले. केएल राहुल (39) व इशान किशन (33) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न करताना चौथ्या गड्यासाठी 63 धावांची भर घातली. वेलालगेने राहुलला बाद केल्यानंतर हार्दिक पंड्याला बाद करीत पाचवा बळी टिपला. वनडेत 5 बळी टिपण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. नंतरच्या एकाही फलंदाजाला असालंकाच्या फिरकीसमोर टिकाव धरता आला नाही. अक्षर पटेलने अखेरच्या गड्यासाठी सिराजसमवेत 27 धावांची भर घालत संघाला दोनशेपारचा टप्पा गाठून दिला. उत्तुंग फटका मारताना तो झेलबाद झाला. अक्षरने 36 चेंडूत 26 धावा जमविल्या. महीश थीक्षणाने एक बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक : भारत 49.1 षटकांत सर्व बाद 213 : रोहित शर्मा 48 चेंडूत 53, गिल 25 चेंडूत 21, कोहली 3, इशान किशन 61 चेंडूत 33, केएल राहुल 44 चेंडूत 39, हार्दिक पंड्या 5, जडेजा 4, अक्षर पटेल 36 चेंडूत 26, बुमराह 5, कुलदीप 0, सिराज नाबाद 5, अवांतर 21. गोलंदाजी : वेलालगे 5-40, असालंका 4-18, थीक्षना 1-41.
लंका 41.3 षटकांत सर्व बाद 172 : वेलालगे 46 चेंडूत नाबाद 42, धनंजय डिसिल्वा 66 चेंडूत 41, असालंका 22, समरविक्रमा 17, मेंडिस 15, अवांतर 15. गोलंदाजी : कुलदीप 4-43, जडेजा 2-33, बुमराह 2-30, सिराज 1-17, हार्दिक 1-14.
पाक व लंका यांच्यात अंतिम फेरीसाठी चुरस
गुरुवारी पाक व लंका यांचा सामना होणार असून यातील विजयी संघ अंतिम फेरीत पोहोचेल. सामना पावसामुळे रद्द झाल्यास लंकेचा नेट रनरेट पाकपेक्षा सरस असल्याने ते अंतिम फेरीत खेळतील. भारताचा शेवटचा सामना शुक्रवारी 15 रोजी बांगलादेशविरुद्ध होणार आहे. या सामन्याच्या निकालाचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही.









