वृत्तसंस्था/ जोहोर बेहरु (मलेशिया)
येथे सुरू असलेल्या सुल्तान जोहोर चषक पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत शनिवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारतीय पुरूष हॉकी संघाने यजमान मलेशियाचा 3-1 अशा गोल फरकाने पराभव केला. या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात पाकने भारताला बरोबरीत रोखले होते.
मलेशिया विरूद्धच्या सामन्यात उत्तमसिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय कनिष्ठ हॉकी संघाने 28 व्या मिनिटाला आपले खाते उघडले. आदित्य लालगेने हा मैदानी गोल केला. मध्यंतरापर्यंत भारताने 1-0 अशी आघाडी मलेशियावर घेतली होती. उत्तरार्धातील खेळाला प्रारंभ झाल्यानंतर 37 व्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल अमनदीप लाक्राने केला. 54 व्या मिनिटाला रोहितने भारताचा तिसरा गोल नोंदवून मलेशियाचे आव्हान 3-1 असे संपुष्टात आणले. मलेशियाने या सामन्यात 13 व्या मिनिटाला आपले खाते उघडले होते. मलेशियाच्या सुहेमी इरफान शमीने हा गोल केला. या गोलनंतर भारताला मध्यंतराला दोन मिनिटे बाकी असताना पाठोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळाले. पण त्यापैकी एका कॉर्नरवर भारताला गोल नोंदविता आला. मलेशियाच्या बचाव फळीची कामगिरी भक्कम झाल्याने भारताला आणखी तीन पेनल्टी कॉर्नर्स मिळूनही गोल करता आला नाही. या सामन्यातील विजयामुळे विद्यमान विजेत्या भारताला 3 गुण मिळाले. आता भारताचा या स्पर्धेतील पुढील सामना सोमवारी न्यूझीलंड बरोबर होत आहे.









