वृत्तसंस्था/ चेन्नई
येथे सुरू झालेल्या स्क्वॉश वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने विजयी सलामी देताना पहिल्या लढतीत हाँगकाँगचा 4-0 असा पराभव केला. ब गटातील ही लढत एक्स्प्रेस अव्हेन्यू मॉल येथे खेळविण्यात आली.
भारतीय संघात आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेती जोश्ना चिन्नप्पा, सौरभ घोषाल, तन्वी खन्ना व अभय सिंग यांचा समावेश असून या चौघांनीही आपापले सामने जिंकून हाँगकाँगवर एकतर्फी मात केली. अभय सिंगने चुंग याट लाँगचा 7-2, 7-3, 7-6, जोश्ना चिन्नप्पाने चिंग हेई फुंगचा 7-1, 7-5, 7-5, सौरभ घोषालने आंद्रेस लिंगचा 5-7, 7-2, 7-5, 7-1, तन्वी खन्नाने टॉबी त्सेचा संघर्षपूर्ण लढतीत 5-7, 6-7, 7-1, 7-4, 7-3 असा पराभव केला.

स्क्वॉश वर्ल्ड कप या सांघिक स्पर्धेची ही चौथी आवृत्ती असून 12 वर्षांच्या खंडानंतर आंतरराष्ट्रीय कॅलेंडरमध्ये त्याचा पुन्हा सामील करण्यात आले आहे. 17 जूनला त्याची सांगता होणार आहे. भारताचा ब गटात समावेश असून याच गटात हाँगकाँग, चीन, जपान, दक्षिण आफ्रिका तर ऑस्ट्रेलिया, कोलंबिया, इजिप्त, मलेशिया यांचा अ गटात समावेश आहे.

या स्पर्धेत दोन टप्पे असून पहिला गट टप्पा आणि दुसरा बाद फेरी व क्लासिफिकेशन टप्पा घेतला जाईल. गट टप्प्यासाठी चार संघांचे दोन गट करण्यात आले आहेत. भारताने आजवर एकदाही स्क्वॉश वर्ल्ड कप जिंकलेला नाही. 1996 मध्ये झालेल्या पहिल्या स्पर्धेत ऑस्टेलियाने जेतेपद पटकावले होते तर 1999 मधील दुसऱ्या स्पर्धेत इंग्लंडने जेतेपद मिळविले होते. भारताची दुसरी लढत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे.









