वृत्तसंस्था/ सालालाह, ओमान
मनिंदर सिंग व मोहम्मद राहील यांनी नोंदवलेल्या अनुक्रमे चार व तीन गोलांच्या बळावर भारताच्या पुरुष संघाने आशियाई हॉकी फाईव्ह विश्वचषक पात्रता स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात बांगलादेशचा 15-1 एकतर्फी धुव्वा उडविला.
मनिंदरने 10, 18, 28, 30 व्या मिनिटाला गोल नोंदवले तर राहीलने दुसऱ्या, 15 व 24 व्या मिनिटाला गोल केले. याशिवाय सुखविंदर (13 व 22 वे मिनिट), गुरजोत सिंग (13 व 23 वे मिनिट), पवन राजभर (19 व 26 वे मिनिट) यांनी प्रत्येकी 2 तर मनदीप मोर (8 वे मिनिट) व दिप्सन तिर्की (9 वे मिनिट) यांनी एकेक गोल केले. बांगलादेशचा एकमेव गोल सावन सरोवरने दुसऱ्या मिनिटाला नोंदवला. भारताने या सामन्यात पूर्ण वर्चस्व राखले होते. मात्र पहिला गोल बांगलादेशने नोंदवला. त्यानंतर त्यांना अखेरपर्यंत एकही गोल नोंदवता आला नाही.