वृत्तसंस्था/ जेरुसालेम
फिडेच्या विश्व सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत मंगळवारी ब गटातील पाचव्या फेरीच्या लढतीत भारताने अमेरिकेचा 3-1 अशा गुणांनी पराभव करत उपांत्यपूर्व फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध केली.
या स्पर्धेतील भारताचा हा दुसरा विजय आहे. आता भारत आणि फ्रान्स यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होईल. अमेरिका विरुद्धच्या ब गटातील लढतीत भारताच्या विदित गुजराती, एस. एल. नारायणन यांनी अनुक्रमे अमेरिकेच्या निमेन आणि ऍकोबियान यांच्यावर विजय मिळविला. विदित गुजरातीने 37 व्या चालीत निमेनचा पराभव केला. तर एस. एल. नारायणनने ऍकोबियानवर 38 व्या चालीत मात केली. भारतीय संघातील निहाल सरीन आणि एस. पी. सेतुरामन यांनी आपले डाव बरोबरीत सोडविले. निहाल सरीनने अमेरिकेच्या ओनिश्चुकला तर सेतुरामनने पेरेझला बरोबरीत रोखले.
या स्पर्धेत चीन-पोलंड, स्पेन-अझरबैजान, युपेन-उझ्बेक यांच्यात उपांत्यपूर्व फेरीच्या लढती होतील. तिसऱया आणि चौथ्या फेरीमध्ये भारतीय संघाला संमिश्र यश मिळाले होते. तिसऱया फेरीतील लढतीत भारताने अझरबैजानवर मात केली तर चौथ्या फेरीत उझ्बेकने भारतावर विजय मिळविला होता.









