सीमेवर कुंपण उभारणे अन् घुसखोरीचा मुद्दा उपस्थित होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत-बांगलादेश सीमेवर कुंपण उभारण्यावरून दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला असताना महासंचालक स्तरीय होण्याची शक्यता बळावली आहे. दोनवेळा स्थगित झालेली ही चर्चा आता 16 फेब्रुवारीपासून नवी दिल्लीत सुरू होण्याची शक्यता आहे. चर्चेदरम्यान सीमेवर कुंपण उभारणे आणि बांगलादेशात सत्तापरिवर्तन झाल्यानंतरच्या घुसखोरीच्या स्थितीवर चर्चा होऊ शकते.
बांगलादेशच्या विदेश मंत्रालयाने अलिकडेच सीमेवर कुंपण उभारण्याच्या निर्णयावर तीव्र चिंता व्यक्त करत स्वत:चा आक्षेप नोंदविण्यासाठी भारतीय उच्चायुक्ताला पाचारण केले होते. भारत द्विपक्षीय कराराचे उल्लंघन करत सीमेवर पाच ठिकाणी कुंपण उभारण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप बांगलादेशने केला होता. यानंतर भारताच्या विदेश मंत्रालयाने सोमवारी बांगलादेशच्या राजदूताला पाचारण करत सीमेवर कुंपण उभारताना सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जात असल्याचे स्पष्ट केले होते.
या पार्श्वभूमीवर आता बीजीबी-बीएसएफ महासंचालक स्तरावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. बॉर्डर गार्ड बांगलादेशचे (बीजीबी) एक शिष्टमंडळ या द्विवार्षिक चर्चेच्या 55 व्या आवृत्तीत 16-19 फेब्रुवारीपर्यंत बीएसएफसोबत चर्चा करणार आहे. बांगलादेशात शेख हसीना यांना सत्ता सोडावी लागल्यावर महासंचालक स्तरावर होणारी पहिली चर्चा ठरणार आहे. यापूर्वी दोनवेळा चर्चा स्थगित करण्यात आली होती.
सीमेवर कुंपण उभारण्याचा मुद्दा
भारत-बांगलादेशदरम्यान एकूण 4,096 किलोमीटर लांब आंतरराष्ट्रीय सीमा आहे. यातील 95.8 किलोमीटर क्षेत्राला व्यापणाऱ्या सुमारे 92 क्षेत्रांवर कुंपण उभारण्याच्या कृतीवर बांगलादेशने आक्षेप घेतला असून या मुद्द्यावर चर्चा होणार आहे. या चर्चेचा एक संयुक्त रिकॉर्ड तयार केला जाणार असून यावर बीएसएफ आणि बीजीबीच्या प्रमुखांची स्वाक्षरी असेल. सीमेवर पुंपण उभारण्याचे काम सरू असल्याचे बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तर पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुरातील काही ठिकाणांवरुन बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी मुद्दा उपस्थित केला होता, परंतु अन्य ठिकाणी काटेरी कुंपणाचे काम सुरू आहे.
घुसखोरीच्या घटनांमध्ये वाढ
महासंचालक स्तरीर चर्चेत भारताकडून सीमेवरील घुसखोरीच्या प्रयत्नांचा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे. मागील वर्षाच्या ऑगस्टपासून बांगलादेशातून घुसखोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही घुसखोरी मानव तस्करी आणि सीमापार तस्करीशी संबंधित आहे. ऑगस्ट ते डिसेंबर या कालावधीत बीएसएफच्या जवानांनी घुसखोरी करणाऱ्या 1,956 बांगलादेशी नागरिकांना पकडले आहे. तर पूर्ण वर्षात 3474 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले हेते. तर 2023 मध्ये बीएसएफने 4342 बांगलादेशी नागरिकांना पकडले होते.
दरवर्षी चर्चेचे आयोजन
भारत-बांगलादेश दरम्यान महासंचालक स्तरीय सीमा चर्चा 1975 ते 1992 या कालावधीत वार्षिक स्वरुपात व्हायची. परंतु 1993 मध्ये याचे स्वरुप द्विवार्षिक करण्यात आले. ज्यात दोन्ही देशांचे शिष्टमंडळ नवी दिल्ली तसेच ढाका येथे पोहोचून चर्चा करत होते. चर्चेचे मागील आयोजन मार्च महिन्यात ढाका येथे झाले होते. त्यावेळी भारतीय शिष्टमंडळ बांगलादेशच्या दौऱ्यावर गेले होते.









