वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा अमेरिका आणि विंडीज यांच्या संयुक्त यजमानपदाने 1 जूनपासून सुरु होणार आहे. तत्पूर्वी या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांसाठी सरावाचे सामने आयोजित केले आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील सरावाचा सामना 1 जूनला खेळविला जाणार असून या सामन्याचे ठिकाणी आणि वेळ घोषित केलेली नाही.
आयसीसीने या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी सराव सामन्यांचे वेळापत्रक शुक्रवारी जाहीर केले. सदर सरावाचे सामने 27 मे ते 1 जून दरम्यान अमेरिका तसेच त्रिनिदाद-टोबॅगो येथे खेळविले जातील. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या 20 संघांपैकी 17 संघांसाठी हे सरावाचे सामने राहतील. दक्षिण आफ्रिकेचा सरावाचा सामना फ्लोरिडा येथे 29 मे रोजी होईल. माजी विजेते इंग्लंड तसेच गेल्या विश्वचषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील उपविजेता पाकिस्तान त्याचप्रमाणे उपांत्य फेरीत प्रवेश मिळविणारा न्यूझीलंड संघ कोणतेही सरावाचे सामने खेळणार नाही. 22 मेपासून इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 4 सामन्यांची द्विपक्षीय टी-20 मालिका इंग्लंडमध्ये होणार आहे. तसेच इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 5 सामन्यांची टी-20 मालिका पाकमध्ये खेळविली जाईल. मात्र न्यूझीलंडचा संघ एकही सराव सामना न खेळताना आपल्या विश्वचषक स्पर्धेतील मोहिमेला 8 जूनपासून प्रारंभ करणार असून त्यांचा सलामीचा सामना अफगाणबरोबर होणार आहे. या स्पर्धेपूर्वी आयोजित केलेल्या 16 सराव सामन्यांची ठिकाणे जाहीर करण्यात आले असून त्यामध्ये टेक्सासचे पीसीएस स्टेडियम, फ्लोरिडातील ब्रोवॉर्ड काऊंटी स्टेडियम, क्विन्स पार्क ओव्हल आणि ब्रायन लारा क्रिकेट अकादमी स्टेडियमचा समावेश आहे. हे दोन स्टेडियम्स त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये आहेत. या सरावाच्या सामन्यासाठी सहभागी होणाऱ्या संघांना आपल्या सर्व म्हणजे 15 खेळाडूंना सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. विंडीज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सरावाचा सामना 30 मे रोजी क्विन्स पार्क ओव्हल मैदानावर होणार आहे. 30 मेपासून क्रिकेट शौकिनांसाठी सामन्यांच्या तिकीट विक्रीला प्रारंभ केला जाईल. टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांची तिकीटे टी-20 वर्ल्ड कप डॉट कॉम किंवा अॅट बॉक्स ऑफिसेस (राष्ट्रीय क्रिकेट सेंटर, क्विन्स पार्क ओव्हल) येथे संपर्क साधावा.
सरावाचे सामने – 27 मे कॅनडा वि. नेपाळ – टेक्सास, ओमान वि. पापुआ – न्यू गिनिया – त्रिनिदाद-टोबॅगो, नामिबिया वि. युगांडा – त्रिनिदाद – टोबॅगो, 29 मे दक्षिण आफ्रिका इंट्रा स्कॉडमध्ये सामना – फ्लोरिडा, अफगाण वि. ओमान – क्विन्स पार्क ओव्हल, 30 मे नेपाळ वि. अमेरिका – टेक्सास, स्कॉटलंड वि. युगांडा – त्रिनिनाद-टोबॅगो, नेदरलँड्स वि. कॅनडा – टेक्सास, नामिबिया वि. पापुआ – न्यू गिनिया – ब्रायन लारा क्रिकेट अकादमी, विंडीज वि. ऑस्ट्रेलिया – क्विन्स पार्क ओव्हल, 31 मे आयर्लंड वि. लंका – फ्लोरिडा, स्कॉटलंड वि. अफगाण – क्विन्स पार्क ओव्हल, 1 जून बांगलादेश वि. भारत-टीबीसी अमेरिका.









