वृत्तसंस्था/थीमफु
येथे शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या 17 वर्षांखालील वयोगटाच्या सॅफ चॅम्पियनशीप फुटबॉल स्पर्धेत अ गटातील पहिला सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळविला जाणार आहे. या स्पर्धेत अ गटामध्ये भारत-बांगलादेश आणि मालदिव यांचा समावेश आहे. गट बमध्ये यजमान भूतान, नेपाळ, श्रीलंका आणि पाकिस्तान यांचा समावेश आहे. प्रत्येक गटातील आघाडीचे दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीचे सामने 28 सप्टेंबरला तर अंतिम सामना 30 सप्टेंबरला खेळविला जाईल. भूतानमध्ये होणाऱ्या या स्पर्धेला शौकिनांचा चांगला प्रतिसाद अपेक्षित आहे.
2022 साली भारतीय फुटबॉल संघाने या स्पर्धेचे जेतेपद पटकाविले होते. गेल्या वर्षी ही स्पर्धा 16 वर्षांखालील वयोगटासाठी घेण्यात आली होती. भारत आणि बांगलादेश यांच्यात अ गटातील सलामीचा सामना होणार आहे. एक वर्षांपूर्वी भूतानमधील थीमफु येथे झालेल्या या स्पर्धेत भारताने सलामीच्या सामन्यात बांगलादेशचा 1-0 असा पराभव केला होता. त्या सामन्यामध्ये टी. उत्तमसिंगने एकमेव निर्णायक गोल केला होता. त्यानतंर पुन्हा याच दोन संघामध्ये जेतेपदासाठी लढत झाली आणि भारताने बांगलादेशचा 2-0 असा पराभव करत 2023 च्या स्पर्धेतील अंतिम सामन्याची पुनरावृत्ती केली. भारतीय फुटबॉल संघ या स्पर्धेतील विद्यमान विजेता असल्याने साहजिकच शुक्रवारच्या सामन्यात त्यांच्यावर पूर्ण गुण वसुल करण्यासाठी अधिक दडपण राहिल.









