वृत्तसंस्था/ शिलाँग
2027 एएफसी आशियाई चषक तिसऱ्या फेरीच्या पात्रता फुटबॉल सामन्यात भारताला आवश्यक असलेली सुरुवात मिळू शकली नाही. येथे झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या या सामन्यात भारताला गोलशून्य बरोबरीत समाधान मानावे लागले.
पूर्वार्धात बांगलादेशची कामगिरी भारतापेक्षा सरस झाली. त्यांनी जास्त आक्रमक चाली आणि कॉर्नर किक्स केले. पण त्यांना स्पष्टपणे एकही संधी मिळू शकली नाही. उत्तरार्धात भारताने आपल्या खेळात बरीच सुधारणा केली आणि बांगलादेशला सतत दडपणाखाली ठेवले. पण गोल करण्याची संधी भारताला मिळू शकली नाही. 12 व्या मिनिटाला भारतीय गोलरक्षक विशाल कैथने एक चूक केली. त्याने मारलेला चेंडू प्रतिस्पर्धी खेळाडू मोहम्मद रिदयकडे गेला. त्याने त्यावर ताबा घेत डाव्या पायाने मोकळ्या गोलपोस्टकडे मारला. पण सुभाशिष बोसने अगदी गोललाईनजवळ चेंडू क्लीअर करीत भारतावरील धोका टाळला. भारताला 31 व्या मिनिटाला सर्वोत्तम संधी मिळाली होती. मात्र लिस्टन कुलासोने डावीकडून दिलेल्या क्रॉसवर उदांता सिंगने मारलेला हेडर बांगलादेशचा गोलरक्षक मितुल मारमाला चुकवू शकला नाही. 68 व्या मिनिटालाही बोसने मारलेला एक फटका काही इंचावरून बाहेर गेला.
याच दोन संघांत 18 नोव्हेंबरला बांगलादेशमध्ये लढत होणार आहे. मात्र भारताची पुढचा पात्रता सामना 10 जून रोजी कोवलून येथे हाँगकाँगविरुद्ध होणार आहे. भारताचा क गटात समावेश असून याच गटात बांगलादेश, हाँगकाँग व सिंगापूर यांचा समावेश आहे. सहा सामन्यानंतर अव्वल स्थान मिळविणारा संघ एएफसी आशियाई चषकासाठी पात्र ठरणार आहे.









