संघर्ष करणाऱया बांगलादेशविरुद्ध भारताची बाजू वरचढ
वृत्तसंस्था/ ऍडलेड
टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताची सुपर 12 फेरीतील महत्त्वाची लढत आज (बुधवारी) बांगलादेशविरुद्ध होत असून आक्रमक खेळणाऱया रिषभ पंतला दिनेश कार्तिकच्या गैरहजेरीत संधी मिळण्याची अपेक्षा आहे. त्याला आघाडीवर पाठवण्याची शक्यता असली तरी आतापर्यंत खराब प्रदर्शन झालेल्या केएल राहुलवरच पुन्हा एकदा संघव्यवस्थापन भरवसा दाखविण्याची शक्यता आहे. हा सामना दुपारी 1.30 वाजल्यापासून सुरू होणार आहे. भारताने विजय मिळविल्यास त्यांचे स्थान आणखी भक्कम होणार आहे.
बांगलादेशविरुद्धचे सामने भारतासाठी नेहमीच केकवॉक ठरले आहेत. मात्र कधी कधी त्यांच्याकडून धक्काही बसलेला आहे. मात्र या स्पर्धेत बांगलादेशकडून अपेक्षित कामगिरी झालेली नसल्याने या सामन्यात भारतालाच फेव्हरिट मानले जात आहे. पर्थच्या वेगवान खेळपट्टीवर भारताला दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा धक्का बसला होता. त्यामुळे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासमोर काही मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. तीन सामन्यात 22 धावा करणाऱया केएल राहुलची कामगिरी तसेच पाक व द.आफ्रिका यासारख्या बडय़ा संघांविरुद्धचा त्याचा फ्लॉप शो पाहून त्याच्या तंत्राबद्दल व टेम्परामेंटबद्दल शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. मात्र प्रशिक्षक द्रविड यांचा त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याने त्याला या सामन्यातही सलामीला कायम ठेवले जाईल.

या स्पर्धेत बांगलादेशच्या गोलंदाजांचे फारसे प्रभावी प्रदर्शन झालेले नाही. त्यामुळे फॉर्म मिळविण्यासाठी राहुलला ही चांगली संधी मिळाली आहे. मुस्तफिजूर रहमान, तस्किन अहमद, मेहिदी हसन मिराज, कर्णधार शकीब अल हसन व हसन मेहमूद हे चांगले गोलंदाज आहेत, पण ते जागतिक दर्जाचे वाटत नाहीत. सूर्यकुमार यादव, कोहली यांनी अप्रतिम डाव खेळले आहेत तर नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतक नोंदवणारा कर्णधार रोहित शर्माही चांगल्या टचमध्ये दिसून आला. आक्रमक खेळणाऱया पंतचा समावेश झाल्यास तो व सूर्यकुमार फलंदाजी लाईनअपमधील एक्स फॅक्टर ठरू शकतात. कार्तिक जखमी असला तरी बुधवारी सामन्याआधी त्याच्या तंदुरुस्तीचा आढावा घेतल्यानंतरच त्याच्या समावेशाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे प्रशिक्षक द्रविड यांनी सांगितले. मात्र तो अनफिट ठरल्यास पंतला निश्चितच संधी मिळू शकेल.
बांगलादेश संघात कर्णधार शकीब, सलामीवीर सौम्या सरकार, नजमुल हुसेन शांतो व मध्यफळीतील अफिफ हुसेन हे चार डावखुरे फलंदाज असल्याने ऑफस्पिनर आर. अश्विनला या सामन्यासाठी कायम ठेवले जाते की, अक्षर पटेलला सामावून घेतले जाते, हे पहावे लागले. द.आफ्रिकेविरुद्ध मिलरने अश्विनची बरीच धुलाई केली होती. बांगलादेशच्या फलंदाजांवर भुवनेश्वर, अर्शदीप, शमी हे भारतीय वेगवान त्रिकुट वरचढ ठरेल, अशी खात्री वाटते.
बांगलादेशचा संघर्ष
बांगलादेशच्या फलंदाजांना या स्पर्धेत झगडावे लागल्याचे दिसून आले आहे. त्यांनी दोन सामने जिंकले असून झिम्बाब्वेविरुद्ध त्यांनी थरारक विजय मिळविला तर नेदरलँड्सविरुद्ध त्यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला. गोलंदाजीस अनुकूल असणाऱया ऑस्ट्रेलियन खेळपट्टय़ावर दुबळय़ा संघांविरुद्धही बांगलादेशच्या फलंदाजांना झगडावे लागले आहे. तीन सामन्यात फक्त शांतोने शंभरहून अधिक जमविल्या आहेत, त्याही 125 च्या स्ट्राईकरेटने. सलामीवीरासाठी हा स्ट्राईकरेट प्रशंसनीय मानला जात नाही. त्यानंतर अफिफ हुसेनने सर्वाधिक धावा जमविल्या असून अफिफ व मोसद्देक हुसेन अंतिम टप्प्यात कशी फलंदाजी करतात यावर त्यांना अवलंबून रहावे लागेल. मात्र भारतीय माऱयापुढे त्यांच्यावर बरेच दडपण असेल.
या सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम क्षेत्ररक्षण घेत ऍडलेडमधील संधीप्रकाशात चेंडू नेहमीपेक्षा किंचीत जास्त स्विंग होतो, याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करेल. भारताकडे तीन स्विंग गोलंदाज असल्याने बांगलादेशला कमी धावसंख्येवर रोखण्याचा रोहित शर्मा प्रयत्न करेल.
कर्णधार शकीब हसनचा हरवलेला फॉर्म हा बांगलादेशसाठी चिंतेचा विषय ठरल्याने अव्वल संघांना त्यांची भीती वाटेनाशी झाली आहे. त्याची डावखुरी फिरकी फलंदाजांवर अंकुश ठेवत असली तरी त्यात अपेक्षित धार दिसत नाही. त्यामुळे भारतीय फलंदाज त्याचा लाभ घेतील, अशी शक्यता आहे.
संभाव्य संघ ः भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), राहुल, कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंडय़ा, कार्तिक, पंत, चहल, अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर, शमी, अर्शदीप, हर्षल पटेल, दीपक हुडा.
बांगलादेश ः शकीब हसन (कर्णधार), नजमुल हुसेन शांतो, सौम्या सरकार, अफिफ हुसेन, मोसद्देक हुसेन, मेहिदी हसन मिराज, शोरिफुल इस्लाम, इबादत हुसेन, नुरुल हसन, लिटॉन दास, तस्किन अहमद, हसन मेहमूद, यासिर अली, नसुम हुसेन, मुस्तफिजूर रेहमान.
सामन्याची वेळ ः दुपारी 1.30 पासून.









